|| सागर नरेकर

बदलापूर आणि अंबरनाथसारख्या शहरांच्या नगरपालिकेच्या संकेतस्थळांवर शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षांसह नगरसेवकांची आणि महत्त्वाच्या व्यक्तींची माहिती नसल्याची बाब समोर आली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांसह सर्व शासकीय कार्यालयांची माहिती, प्रक्रिया, अधिकारी, कर्मचारी त्यांची ओळख व्हावी आणि पारदर्शक कारभारासाठी शासकीय संस्थांना आपली संकेतस्थळे सुस्थितीत राखणे आवश्यक आहे. नगरपालिकांची माहिती, योजना, अर्ज आणि समस्या मांडण्यासाठीही संकेतस्थळे आवश्यक आहेत. नव्याने शहरात येणाऱ्या किंवा शहराबाहेरच्या एखाद्या व्यक्तीसाठी अशा नगरपालिकांची संकेतस्थळे माहितीसाठी मोठा स्रोत असतात. असे असताना नगरपालिकांच्या यादीत अ वर्गात मोडणाऱ्या कुळगाव-बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिकांची संकेतस्थळे माहितीच्या बाबतीत मागास असल्याचे दिसून आले आहे. दोन्ही नगरपालिकांच्या संकेतस्थळावर शहराचे प्रथम नागरिक असलेल्या नगराध्यक्षांसह उपनगराध्यक्ष विविध प्रभागाचे नगरसेवक, स्थायी समिती, विषय समित्या आणि स्वीकृत नगरसेवकांचीही माहिती संकेतस्थळावर उपलब्ध नाही. ‘नागरिकांची सनद’ या पर्यायात आस्थापनाविषयी माहिती असणे आवश्यक आहे. असे असताना जुन्या, बदली आणि निवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावे यावर दर्शवली जात आहेत. माजी मुख्याधिकारी देविदास पवार सध्या अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी आहेत. असे असले तरी भाऊ  निपुर्ते, विजय कदम, सुदर्शन तोडणकर, दिनेश नेरकर, के. डी. पाटील अशा बदली, निवृत्त किंवा पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्यांची नावे संकेतस्थळावर आहेत. रुग्णालय, अग्निशमन दलाची माहिती संकेतस्थळावर नाही. धक्कादायक म्हणजे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्टय़ा महत्त्वाच्या बदलापूर शहराबाबत अवघ्या चार ते पाच ओळीत आणि ओझरता उल्लेख आहे. ऑनलाइन तक्रार केल्यानंतर जुन्याच अधिकाऱ्यांचे संपर्क R मांक येत असल्याने नागरिकांची गैरसोय होते आहे.दरम्यान,  अंबरनाथ नगरपालिकेच्या ttp:// ambarnath council.net  या संकेतस्थळाला ९८ हजार ०४९ नागरिकांनी भेट दिली आहे. तर कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या F https: // kbmc. gov.in  या संकेतस्थळाला ४ लाख ८७ हजार २९८ नागरिकांनी भेट दिली आहे.