ठाणे जिल्ह्यतील वनक्षेत्रात बिबटय़ा, वानर, रानडुकरे, कोल्हे

वनक्षेत्रात होणारी विकासकामे, जंगलांवरील अतिक्रमणे, बेसुमार वृक्षतोड अशा विविध कारणांमुळे ठाणे जिल्ह्यातील वनक्षेत्र आटत चालल्याची ओरड होत असताना, या जंगलांत आजही अनेक वन्यजीवांनी आपला अधिवास कायम ठेवला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बदलापूर आणि मुरबाड येथील जंगलांमधील पाणवठय़ावर येणाऱ्या विविध वन्यजीवांची प्राणीगणना करणाऱ्या वनकर्मचाऱ्यांना या जंगलांमध्ये आजही बिबटय़ा, कोल्हे, रानडुकरे, चितळ, सांबर, वानरे यांचा वावर असल्याचे आढळून आले आहेत.

वन विभागाच्या वतीने दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री जंगलांतील प्राण्यांची गणना करण्यात येते. जंगलांमधील पाणवठय़ांवर वन विभागाचे कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी तळ ठोकून बसतात. या काळात पाणवठय़ावर येणाऱ्या प्राण्यांच्या संख्येवरून जंगलातील वन्यजीवांचा अंदाज व्यक्त करण्यात येतो. यंदाच्या वर्षी झालेल्या प्राणीगणनेत वन विभागाला राष्ट्रीय उद्यानात ७ बिबटे आढळून आले. तर मुरबाडमध्ये एकाही बिबटय़ाचे दर्शन झाले नाही. गेल्या वर्षी मुरबाड परिसरात बिबटय़ाने स्थानिकांमध्ये दहशत निर्माण केली होती. आजही थितबी, सोनावळे, सिद्धेश्वर वाडी या ठिकाणी बिबटय़ाचा वावर असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तर मुरबाडच्या पाणवठय़ावर काही ठिकाणी वन कर्मचाऱ्यांना बिबटय़ाच्या पाऊलखुणा व विष्ठा दिसल्याने येथे बिबटय़ा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या जंगलांमध्ये सर्वाधिक संख्या चितळांची (३९२) आहे. त्याखालोखाल या ठिकाणी २१७ माकडे, वानरे आढळून आली. याखेरीज चितळ, रानडुक्कर, ससे, कोल्हे, मोर, भेकर, सांबर, घार, रानकोंबडा, चितळ, मुंगूस, घुबड, वटवाघूळ हे प्राणी या जंगलांमध्ये आढळून आले. त्याचप्रमाणे सर्पगरुड, कोकीळ, रेड विस्पर्ड बुलबुल, कॉपरस्मिथ बाबेट, ब्राउन हेडेड बार्बेट, पर्पल सनबर्ड, व्हाइट थ्रोटेड किंगफिशर, पिट्टा, एशियन कोयल, कॉमन टेलरबर्ड, जंगल बॅबलर, ग्रे नाइटजार, ऑरेंज हेडेड थ्रश, कॉमन क्रो, ड्रोंगो, हेरॉन, इंडियन ग्रे हॉर्नबिल, नाइट हेरोना आदी पक्षी येऊर परिक्षेत्रातील जंगलात आढळले आहेत.

जंगलनिहाय प्राण्यांची संख्या

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

बिबटे-७, चितळ-३९२, सांबर-३७, रानडुक्कर-३२, लंगूर-८६, रानकोंबडी-२८, माकडे-१७४, वटवाघुळ-१२४, रानमांजर-९, मुंगूस-१९, मोर-३७, ससे-२, घुबड-३, सर्पगरूड-२, मसन्या उद-३, कोयल-१, रेडविस्पर्ड बुलबुल-४, कॉपरस्मिथ बाबेऱ्ट-२, ब्राऊन हेडेड बार्बेट-१, पर्पल सनबर्ड-३, व्हाईट थ्रोटेड किंगफिशर-१, पिट्टा-१, एशियन कोयल-१, कॉमन टेलरबर्ड-७, जंगल बॅबलर-१, ग्रे नाईटजार-१, ऑरेंज हेडेड थ्रश-१, कॉमन क्रो-१, ड्रोंगो-२, हेरॉन-२, इंडियन ग्रे हॉर्नबिल-१, नाईट हेरोना-१.

बदलापूर

वानर-४८, ३४ रानडुक्कर, ३८ ससे, कोल्हे-४, तरस-२, मुंगूस-४४, घार-१०, मोर-२० , भेकर-३

मुरबाड

वानर ६५, रानकोंबडे-४ , रानडुक्कर-१८, ससे-८, भेकर-६