News Flash

मच्छीमार ‘वांब’मार्गाला!

दिवाळीनंतरच्या चार महिन्यांच्या कालावधीत मिळणारा वांब मासा मच्छीमारांसाठी फायदेशीर ठरत असतो.

पालघरमधील मच्छीमार वांब मासे पकडण्यासाठी पारंपरिक गळाचा वापर करत आहेत.

नीरज राऊत

मासेमारीसाठी पालघरमधील मच्छीमारांकडून गळ पद्धतीचा अवलंब; वांब माशांच्या विक्रीतून फायदा

दिवाळीनंतरच्या चार महिन्यांच्या कालावधीत मिळणारा वांब मासा मच्छीमारांसाठी फायदेशीर ठरत असतो. मात्र गेल्या काही वर्षांपासून हा मासा जाळय़ात सापडत नसल्याने गळाच्या माध्यमातून केली जाणारी पारंपरिक मासेमारी पद्धत सातपाटी आणि पालघर जिल्ह्यातील मच्छीमार अवलंबू लागले आहेत. या पद्धतीमुळे मोठय़ा प्रमाणात वांब मासे मच्छीमारांना मिळू लागले असून २५० ते ५०० रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या या माशामुळे मच्छीमारांना फायदा होऊ लागला आहे.

माशांची संख्या मुबलक प्रमाणात असताना पूर्वीच्या काळी गळाच्या माध्यमातून मासेमारी केली जात असे. मात्र मत्स्यसंपदा कमी झाल्यानंतर पाण्याच्या प्रवाहाबरोबर समुद्राच्या पृष्ठभागावर, मध्यभागावर आणि तळाच्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने आणि विविध आकारांच्या (आस) जाळ्यांच्या मदतीने मासेमारी करण्याचे तंत्र विकसित  झाले. गेल्या काही वर्षांत मत्स्य दुष्काळाचे सावट पसरले तसेच मासेमारी अधिक जिकिरीची झाली असून दिवाळीनंतर जानेवारी-फेब्रुवारी महिन्यापर्यंत मिळणारा वांब मासा सध्या जाळ्यामध्ये सहजासहजी सापडत नसल्याने सातपाटी आणि जिल्ह्यतील इतर मच्छीमारांनी गळाच्या माध्यमाने पुन्हा मासेमारी करण्याची पद्धत सुरू केली आहे.

ऑगस्ट महिन्यामध्ये मासेमारीचा हंगाम सुरू झाल्यानंतर पहिले तीन ते चार महिने पापलेटची (सरंगा) मासेमारी या भागांतील मच्छीमारांकडून केली जाते. दिवाळीनंतर समुद्राच्या तळाला असलेल्या वांब मासे पकडण्याचा मच्छीमार प्रयत्न करत असतात. पूर्वीच्या काळी हे मासे सहजगत जाळ्यांमध्ये अडकत असत. मात्र त्यांच्या विशिष्ट शरीर रचनेमुळे त्यांची पकड सहजासहजी होत नसल्याने मच्छीमारांनी गळाचा वापर करून मासेमारीस सुरुवात केली आहे.

रायगड, रत्नागिरी तसेच दक्षिणेकडील राज्यांमध्ये गळाच्याच माध्यमातून मासेमारी अजूनही करण्यात येते. याच पद्धतीला पालघरच्या मच्छीमारांनी पुनजीíवत करून पुन्हा मासेमारी सुरू केली आहे. या पद्धतीमध्ये वाम मासे गळाला लागण्याचे प्रमाण अधिक आहे.

घासाचा लोभ माशांना घातक

वांब माशांची संदुरातील उपलब्धता कमी झाली असून या माशाच्या विशिष्ट रचनेमुळे हा मासा जाळ्यात अडकणे काहीसे कठीण होते. शिवाय मासेमारी बोटीच्या प्रवास क्षेत्रात माशांचे थवे आले तर पकड होत असते. गळाच्या मध्ये येणाऱ्या वांब माशाच्या खाद्याकडे हा मासा आकर्षित होऊन गळाला सहजगत अडकतो. एका फेरीमध्ये शेकडो मासे या पद्धतीने पकडले जातात. ‘काटी’ किंवा ‘दाताळ’ या माशांचे तुकडे या गळामध्ये घास म्हणून वापरले जात असून त्याची स्वतंत्रपणे मासेमारी केली जाते किंवा बाजारातून विकत आणले जातात.

चार महिने फायद्याचे

बारा ते तीस वाव (एक वाव म्हणजे सुमारे सहा फूट) या खोलीवर वांब मासे मुबलक प्रमाणात मिळत असून नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळादरम्यान या माशांची प्रामुख्याने मासेमारी केली जाते. बाजारात वांब माशाला २५० ते ५०० रुपये दर मिळतो. त्यामुळे या चार महिन्यांच्या काळात वांब माशांमुळे मच्छीमारांना फायदा होत आहे.

मासेमारी कशा पद्धतीने?

* अडीच ते तीन किलोमीटर लांबीच्या दोराला प्रत्येक १८ फुटांवर चार ते पाच इंचाचा गळ बसवण्यात येतो.

* ४०० ते ५०० गळांचा हा दोर (खांदा) समुद्राच्या तळापर्यंत पोहोचेल या पद्धतीने वजन आणि तरंगणाऱ्या फ्लोटद्वारे व्यवस्था केली जाते.

* समुद्रातील ओहोटी आणि भरती संपण्याच्या एक तासापूर्वी बोटीच्या साहाय्याने हा खंडा समुद्रामध्ये तळाच्या भागात सोडण्यात येतो.

* वांब माशाला आवडणारे ‘काटी’ किंवा ‘दाताळ’ या माशांचे तुकडे या गळामध्ये घास म्हणून अडकवले जातात.

* मासेमारी बोटीने विशिष्ट कालावधीत समुद्र भ्रमण केल्यानंतर गळ असलेला हा दोर खेचला जातो आणि त्याला अनेक वांब मासे अडकलेले दिसून येतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2018 2:05 am

Web Title: lock applying for the fisheries to palghar fishermen
Next Stories
1 वाडय़ात वाढत्या वणव्यांनी जंगलांचा नाश
2 नियमभंगाला ई-चलनचा दट्टय़ा
3 गुरचरण जमिनीवरील ‘टीडीआर’वर हल्ला
Just Now!
X