वर्षभरामध्ये थकबाकीदार कंपन्यांकडून १४ कोटींची वसुली

वसई-विरार शहर महापालिकेच्या करवसुली विभागाच्या पथकाने इंडस मोबाइल टॉवर कंपनीकडून मालमत्ता करापोटी तब्बल ३ कोटी ५७ लाख रुपयांची वसुली केली आहे. सदर रकमेचा धनादेश नुकताच कर विभागाने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

महापालिका स्थापन झाल्यापासून पालिका हद्दीतील मोबाइल टॉवर कंपन्यांकडून मालमत्ता कराच्या वसुलीची कार्यवाही मोठय़ा प्रमाणात प्रलंबित होती. या कर वसुलीसाठी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी कर विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वसुलीकरिता कृती आराखडा तयार केला होता.

या कृती आराखडय़ाच्या अंमलबजावणीकरिता कर विभागाचे साहाय्यक आयुक्त विश्वनाथ तळेकर यांच्यासह भावेश पाटील, मनोज पाटील, कुमार पिलेना आदींची नियुक्ती करण्यात आली होती.

महापालिकेच्या कर विभागाच्या पथकाने यापूर्वी मार्च २०१९ मध्ये रिलायन्स जियो कंपनी, मे २०१९ मध्ये इंडस कंपनी तसेच जून २०१९ मध्ये एटीसी मोबाइल टॉवर कंपनीकडून मोबाइल टॉवरच्या मालमत्ता करापोटी १४ कोटी ४५ लाख रुपये वसूल केले होते.

काही मोबाइल कंपन्यांची बिले निघाली नव्हती. त्यामुळे कराची रक्कम थकीत राहिली होती. करविभागाचे पथक या वसुलीचा नेटाने पाठपुरावा करत आहे.  – विश्वनाथ तळेकर साहाय्यक आयुक्त, कर विभाग