राज्यातील रात्रशाळांमध्ये प्रामुख्याने कामगार व कष्टकरी वर्गातील विद्यार्थी शिकत असून त्यांच्यासाठीच्या निकषात शिथिलता आणल जाईल, जेणेकरून रात्रशाळा चालविण्यात कोणती अडचण येणार नाही, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.
बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकार २००९ अंतर्गत शासनाने २८ ऑगस्ट रोजी काढलेल्या आदेशामुळे राज्यातील रात्र चालविण्यात येणाऱ्या दीडशे शाळा बंद पडण्याची भीती व्यक्त करत असून या शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांनी येत्या पाच सप्टेंबर रोजी आझाद मैदानावर आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे. राज्यातील दीडशे रात्र शाळांपैकी ११० शाळा या एकटय़ा मुंबईत चालत असून या शाळांमधील प्रत्येकी तीन तुकडय़ांमध्ये वीस ते पंचवीस विद्यार्थी असतात.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत किमान नव्वद विद्यार्थी असतील तरच प्राचार्य नियुक्तीला मान्यता मिळणार आहे. तसेच प्रत्येक तुकडीत किमान पस्तीस विद्यार्थी असणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. या आदेशामुळे बहुतेक शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत तर मुख्यध्यापकांना घरी बसावे लागणार आहे. या साऱ्या शाळांना शासकीय अनुदान असून ते बंद झाल्यास शाळा बंद होण्याची भीती ‘मुंबई शिक्षक लोकशाही आघाडी’ने व्यक्त केली आहे.