मराठी मालिका, रंगभूमी, स्टॅण्डअप कॉमेडी आणि चित्रपट अशा चारही माध्यमांमध्ये मुक्त मुशाफिरी करणारा कलावंत अशी अभिनेता भालचंद्र ऊर्फ भाऊ कदम यांची ओळख सिद्ध झाली आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या शोमधून सध्या भाऊ कदम प्रेक्षकांसमोर नियमितपणे येत असतात. खास शैली, अचूक टायमिंग यामुळे प्रेक्षकांमध्ये लोकप्रियता मिळविलेला हा अस्सल कलावंत होय. रंगभूमीवर त्यांचे ‘रानभूल’ हे नाटक सध्या गाजत असून, आगामी ‘टाइमपास २’, ‘वाजलंच पाहिजे’, ‘जाऊ द्याना बाळासाहेब’, ‘१५ ऑगस्ट भागिले २६ जानेवारी’ अशा चित्रपटांतून ते झळकणार आहेत.  
* आवडते मराठी चित्रपट – ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’
* आवडते हिंदी चित्रपट – ‘आनंद’, ‘मधुमती’, ‘तारे जमीं पर’
* आवडती नाटकं – ‘रानभूल’, ‘शोभायात्रा’, ‘एक डाव भटाचा’
* आवडते टीव्ही कार्यक्रम – ‘तमस’, ‘हमलोग’, ‘श्वेतांबरा’, ‘मालवणी डेज्’
* आवडते खाद्यपदार्थ – आंबोळी, घावने
* आवडती भूमिका – अशोक सराफ यांची ‘आपली माणसं’ चित्रपटातील भूमिका
* आवडता अभिनेता – यशवंत दत्त
* आवडती अभिनेत्री – रंजना
* आवडती चरित्र अभिनेत्री – नीलकांती पाटेकर
* आवडता फूड जॉइंट्स – डोंबिवली पूर्व येथील पाणीपुरी स्टॉल, नॅचरल आईस्क्रीमचे दुकान
* आवडतं हॉटेल – डोंबिवली पूर्व येथील ‘रंगोली’ हॉटेलमध्ये जाऊन मासे खाणे
* डोंबिवलीविषयी थोडेसे : वडाळ्याला बीपीटी कॉलनीत बालपण गेले. वडील निवृत्त झाल्यानंतर डोंबिवली पश्चिम येथे १३-१४ वर्षांपूर्वी राहायला आलो आणि डोंबिवलीकरच होऊन गेलो. स्ट्रगलिंगचा काळ आणि आताही डोंबिवलीहून मुंबईत दूरवर पश्चिम उपनगरांत जाणे आणि तिथून रात्री उशिरा परतणे हे नेहमीचे होऊन गेले आहे. परंतु डोंबिवली सोडून दुसरीकडे जाऊन राहण्याचे मनात येत नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे इथले मराठमोळे वातावरण होय. डोंबिवलीतले लोक नेहमी सांगतात की तुम्ही डोंबिवलीत राहता याचा आम्हाला अभिमान वाटतो. आस्थेने चौकशी करतात. टीव्हीवर पाहिलेल्या भूमिकेबद्दल आवर्जून दाद देतात. एकदा लोकलने डोंबिवली स्थानक सोडले आणि माझे व कुशलचे बोलणे ऐकून एका डोंबिवलीकराने मला विचारले की तुम्ही ‘एक डाव भटाचा’ नाटकात काम करता का? मी हो असे उत्तर दिल्यावर तो म्हणाला की चेहऱ्याने नव्हे तर फक्त आवाजावरून ओळखले. यावर मी मनात म्हटले की अमिताभ बच्चनसारखा कलावंत ज्याला रसिक आवाजाने ओळखतात आणि दुसरे आपण. सण असला की डोंबिवली पाहावी. अगदी रेल्वे स्टेशनवर उतरून प्लॅटफॉर्मच्या बाहेर आले की कोणताही सण असेल तर त्याची झलक इथे नक्कीच दिसते. मराठमोळं वातावरण, मराठमोळी संस्कृती, आपुलकीने, आस्थेने वागणारी माणसं डोंबिवलीत राहतात, म्हणूनच डोंबिवलीशी माझे बंध जुळले आहेत.
शब्दांकन – सुनील नांदगावकर