अंबरनाथ पूर्वेकडील आनंदनगर औद्योगिक क्षेत्रातील डी. जी. केमिकल कंपनीला सोमवारी संध्याकाळी सातच्या सुमारास भीषण आग लागली. यात कंपनीची इमारत जळून खाक झाली. एमआयडीसी, तसेच अंबरनाथ-बदलापूर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या दहा बंबांच्या साहाय्याने रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रात प्लॉट क्रमांक ७१ वर रंगनिर्मिती करणाऱ्या या कंपनीला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले आहे. कंपनीला आग लागल्याने कंपनीतील कर्मचारी तात्काळ बाहेर पडल्याने जीवितहानी टळली. शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.