20 September 2020

News Flash

तुल्यबळाच्या लढाईत ताकद पणाला

सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास प्रेमनाथ पाटील यांनाही पक्षाचा एबी फॉर्म देण्यात आला.

भाईंदर पूर्व येथील प्रभाग ४ ची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणाला अचानक घडलेल्या नाटय़मय घटनेने भाईंदर पूर्व येथील प्रभाग ४ ची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. या प्रभागातील शिवसेनेचे उमेदवार प्रेमनाथ पाटील हे खरे तर भाजपचे नगरसेवक. पक्षाने त्यांना या प्रभागातून पुन्हा उमेदवारी द्यायचे नक्की केले होते. परंतु उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या काही तासांत प्रेमनाथ पाटील यांनी आपला विचार बदलून शिवसेनेतून उमेदवारी दाखल केली. भाजपला हा मोठा धक्का आहे. त्यामुळेच या प्रभागात विजयश्री कोणाला माळ घालते याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.

पूर्वीचा प्रभाग ९ आणि १० एकत्र करून नवा प्रभाग क्रमांक ४ बनला आहे. २०१२ ला प्रभाग ९ मधून काँग्रेसच्या प्रभातताई पाटील आणि मनसे अरविंद ठाकूर निवडून आले होते आणि प्रभाग १० मध्ये तीनही नगरसेवक भाजपचे होते. नव्या प्रभाग रचनेनंतर या दोन्ही प्रभागांचे एकत्रीकरण झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. सलग पाच वेळा निवडून आलेल्या काँग्रेसच्या नगरसेविका प्रभातताई पाटील भाजपमध्ये आल्या, मनसेचे अरविंद ठाकून निवडून आल्यानंतर लगेचच शिवसेनेत गेले होते परंतु आता ते निवडणूक रिंगणातच नाहीत. त्यातच प्रभाग दहा हा भाजपचा बालेकिल्ला. या निवडणुकीसाठी भाजपने प्रभाग ४ मध्ये प्रभातताई पाटील, प्रेमनाथ पाटील, माजी नगरसेवक मधुसूदन पुरोहित रिंगणात उतरविण्याचे नक्की केले होते. केवळ विद्यमान नगरसेविका डिम्पल मेहता आणि सुनीला शर्मा यांच्यापैकी एकाची निवड करण्याचे शिल्लक होते. त्यामुळे या निवडणुकीत प्रभाग ४ मध्ये भाजप एकहाती बाजी मारेल असेच चित्र सुरुवातीच्या काळात होते. मात्र शिवसेनेही या प्रभागासाठी भरभक्कम तयारी केली. गेल्या निवडणुकीत प्रेमनाथ पाटील यांना कडवी झुंज दिलेले धनेश परशुराम पाटील यांच्यासह मनसेतून शिवसेनेत आलेले ताकदवर नेते अरुण कदम यांना भाजपविरोधात उतरविण्याचे सेनेने नक्की केले.

अरुण कदम यांच्या प्रवेशाने शिवसेना या ठिकाणी चांगली लढत देईल, असा विश्वास शिवसेनेला वाटत होता. मात्र तरीही भाजपचे पारडे काही प्रमाणात वरचढ असल्याचे जाणकारांचे मत होते.दोन्ही बाजूंचे पॅनल जवळपास निश्चित असताना उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी २ ऑगस्टला मात्र घडामोडींना अचानक वेग आला. भाजपने २ ऑगस्टला पहाटे चार वाजल्यापासून एबी फॉर्म वाटायला सुरुवात केली. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास प्रेमनाथ पाटील यांनाही पक्षाचा एबी फॉर्म देण्यात आला. परंतु भाजपच्या विद्यमान नगरसेविका डिम्पल मेहता यांना प्रभाग ४ ऐवजी प्रभाग १२ मध्ये उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला आणि प्रेमनाथ पाटील यांच्यासोबत सुनीला शर्मा यांना प्रभाग ४ मध्ये उमेदवारी देण्यात आली. या निर्णयाने प्रेमनाथ पाटील अस्वस्थ झाले. डिम्पल मेहता या भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या नातलग आहेत. त्यांना प्रभाग ४ मध्ये उमेदवारी दिली असती तर नरेंद्र मेहता यांनी या जागा जिंकण्यासाठी पूर्णपणे ताकद लावली असती, परंतु डिम्पल मेहता यांना प्रभाग १२ मध्ये स्थलांतरित करण्यात आल्याने प्रभाग ४ मध्ये भाजपची ताकद कमकुवत झाली असल्याचे प्रेमनाथ पाटील यांना वाटले त्यामुळेच त्यांनी तातडीने आपला विचार बदलत शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला.शिवसेनेनेदेखील या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. प्रभाग ४ मध्ये आपले संभाव्य उमेदवार अरुण कदम यांना उमेदवारी मागे घेण्याची विनंती करून शिवसेनेने लगेचच प्रेमनाथ पाटील यांना पक्षाचा एबी फॉर्म दिला आणि त्यांचा उमेदवारी अर्ज शिवसेनेकडून भरण्यात आला. अचानक झालेल्या या घडामोडींमुळे भाजपला मोठा धक्का बसला. प्रेमनाथ पाटील यांच्या जागी भाजपने माजी नगरसेवक गजानन भोईर यांच्या मुलाला उमेदवारी दिली आहे.भाजपच्या या बालेकिल्ल्यात आता शिवसेनेच्या धनेश पाटील आणि प्रेमनाथ पाटील यांची ताकद एकत्र झाल्याने शिवसेनेने भाजपसमोर तगडे आव्हान उभे केले आहे. आता या तुल्यबळांच्या लढाईत कोणाची सरशी होणार याबाबत प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2017 12:51 am

Web Title: mbmc election 2017 bhayandar east ward 4 review
Next Stories
1 ‘सातबारा’ आता ऑनलाइन
2 Video : अवघ्या १ मिनिट ३ सेकंदात रचला ९ थरांचा मनोरा
3 अपघातात जखमी झालेल्या काँग्रेस नेत्याचे वाढदिवसालाच निधन
Just Now!
X