अल्पवयीन मुलीचा मृत्यू; मुलाची प्रकृती स्थिर
अल्पवयीन प्रेमी युगुलाच्या प्रेमाला त्यांच्या कुटुंबीयांनी तीव्र विरोध केल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या या प्रेमी युगुलाने विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर मुलीचा मृत्यू झाला, तर मुलाला वाचविण्यात डॉक्टरांना यश आले.
नालासोपारा पूर्वेच्या आचोळे रोड येथे ही घटना घडली. डॉन लेने येथे राहणाऱ्या १७ वर्षीय मुलाचे त्याच परिसरात राहणाऱ्या १५ वर्षीय मुलीशी प्रेमसंबंध होते. हा मुलगा अकरावीत तर मुलगी ९ वीत शिकते. त्यांच्या या प्रेमसंबंधाबाबत त्यांच्या कुटुंबीयांना समजल्यानंतर त्यांनी विरोध केला. या दोघांना भेटण्यास आणि बोलण्यासही बंदी घातलीे होतीे. त्यामुळे दोघे वैफल्यग्रस्त झाले होते. रविवारी मुलगी घर सोडून गेली. सोमवारी ती मुलाच्या घरी गेली आणि दोघांनी जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. दोघांनी किटकनाशक प्राशन केले. मुलाच्या घरचे वेळीच घरी पोहोचल्याने दोघांना महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मुलीने इच्छेविरोधात लग्न केल्याने आईची आत्महत्या
मुलीने आपल्या इच्छेविरोधात लग्न केल्याने आईने आत्महत्या केल्याची घटना नालासोपाऱ्यात तुळींज येथे घडलीें. राजेश्वरी अमिन (५९) या महिलेने राहत्या घरात विषप्राशन करून आत्महत्या केलीे. तुळींज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमिन आपल्या मुलीसोबत राहत होती. तिच्या मुलीेच्या प्रेमसंबंधाला तिचा विरोध होता. मात्र आईच्या इच्छेविरोधात जाऊन तिने घर सोडून प्रेमविवाह केला. हा धक्का सहन न झाल्याने तिने आपले जीवन संपवले.