मीरा-भाईंदर महापालिकेच्या निर्णयाला काँग्रेसचा विरोध

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या मीरा रोड येथील भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालयात असलेले शवागार भाईंदर येथे स्थलांतर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मात्र या निर्णयाला काँग्रेसने कडाडून विरोध केला आहे.

महापालिकेच्या भाईंदर पश्चिम येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालय आणि मीरा रोड येथील भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालय अशा दोन ठिकाणी अनुक्रमे २१ आणि १६ शीतपेटय़ा असलेली शवागारे आहेत. यापैकी मीरा रोडचे शवागार भाईंदर येथील शवागारात स्थलांतरित करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. मीरा रोड येथील रुग्णालयाच्या इमारतीत सध्या रुग्णालय, रक्तपेढी आणि शवागार अशी व्यवस्था आहे. हे रुग्णालय २०११ मध्ये कार्यान्वित करण्यात आले आहे.

भाईंदर पश्चिम येथील शवागारालगतच महापालिकेचे शवविच्छेदन गृह आहे. रस्ते तसेच रेल्वे अपघातातील मृतदेह तसेच बेवारस मृतदेह या ठिकाणी शवविच्छेदन केंद्रात आणले जातात आणि अनेक वेळा या मृतदेहांचा ताबा घेण्यास कोणी पुढे येत नसल्याने ते लगतच्याच शवागारत ठेवले जातात. शवागार हे नेहमी शवविच्छेदन केंद्रालगतच असले पाहिजे अशी प्रशासनाची भूमिका आहे. शिवाय मीरा रोडचे सध्याचे रुग्णालय रुग्णांसाठी कमी पडत असल्याने येथील शवागार भाईंदर येथे स्थलांतर करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव आहे. शवागाराच्या जागी इमारतीमधील प्रयोगशाळा स्थलांतरित करून रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविण्याचा प्रशासनाचा विचार आहे.

मात्र शवागार स्थलांतराला काँग्रेसने तीव्र विरोध केला आहे. मीरा रोडची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत मीरा रोड येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेले शवागार स्थलांतर करणे योग्य होणार नाही. त्यामुळे शवागार स्थलांतराचा निर्णय मागे घेण्याचे आदेश द्यावेत असे निवेदन काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आयुक्त बालाजी खतगावकर यांना दिले आहे. याबाबत पूर्ण विचार केल्यानंतरच शवागार स्थलांतर करण्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे.

‘स्थलांतर सोयीचे’

भाईंदर येथे असलेले सध्याचे शवागार प्रशस्त आहे. या शवागारात मीरा रोडच्या शवागारातील १६ शीतपेटय़ा सामावून घेणे सहज शक्य आहे. शिवाय शवागाराच्या सध्याच्या इमारतीवर अजून एक मजला बांधण्याचीदेखील परवानगी प्राप्त आहे. त्यामुळेच शवागार या ठिकाणी स्थलांतर करणे अधिक सोयीचे ठरणार आहे असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.