७४ नगरसेवक निवडणूक रिंगणात; २६जणांची एकमेकांशी लढत

मीरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीत पुन्हा नशीब अजमावणाऱ्या विद्यमान नगरसेवकांपैकी २६ नगरसेवक एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. यात दोन प्रभागांत तिरंगी लढत होत असल्याने निवडणुकीत किमान १४ विद्यमान नगरसेवकांना मतदारांकडून नारळ मिळू शकेल, अशी चिन्हे आहेत.

महापालिकेतील निवडून आलेले ९५ आणि स्वीकृत ५ अशा १०० नगरसेवकांपैकी ७४ नगरसेवक पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र यात फरक इतकाच आहे की यातील अनेक नगरसेवक आपल्या मूळच्या पक्षाला रामराम ठोकून इतर पक्षातून निवडणूक लढवत आहेत. बदललेली प्रभाग रचना, चार सदस्यीय पॅनल पद्धत, मोठे झालेले प्रभाग यांमुळे या निवडणुकीत १२ प्रभागांमध्ये २६ विद्यमान एकमेकांसमोर लढत देत आहेत. दोन प्रभागांत तर प्रत्येकी तीन नगरसेवक एकमेकांसमोर आले असल्याने यातील किमान १४ नगरसेवकांना हार पत्करावी लागणार आहे.

अशी लढत रंगणार..

  • भाईंदर पूर्व येथील प्रभाग ‘३ ब’मधून शिवसेनेच्या नगरसेविका आणि गटनेत्या नीलम ढवण यांच्याविरोधात काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये आलेल्या मनीषा पिसाळ निवडणूक लढवत आहेत.
  • ‘३ ड’ या प्रभागात काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले हंसुकुमार पांडे, काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले स्वीकृत नगरसेवक दिनेश नलावडे आणि बहुजन विकास आघाडीचे मोहन जाधव एकमेकांसमोर उभे राहिले आहेत.
  • गोडदेव गावातील प्रभाग ‘१० अ’मध्ये भाजपचे विद्यमान नगरसेवक व स्थायी समितीचे माजी सभापती प्रशांत केळुसकर विरुद्ध शिवसेनेचे जयंती पाटील असा सामना रंगणार आहे.
  • प्रभाग ‘११ ब’मध्ये राष्ट्रवादीतून आता शिवसेनेत गेलेल्या वंदना विकास पाटील विरुद्ध काँग्रेसच्या सुनीता कैलास पाटील यांच्यात लढत होईल.
  • मीरा रोडमधील प्रभाग ‘१७ ब’मध्ये भाजपच्या दीपिका अरोराविरुद्ध राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या वंदना चक्रे यांच्यात सामना होईल.
  • भाईंदर पश्चिम येथील प्रभाग ‘६ अ’मध्ये राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले ध्रुवकिशोर पाटील विरुद्ध शिवसेनेच्या शुभांगी कोटीयन, प्रभाग ‘६ ड’मध्ये भाजपचे राजेंद्र जैनविरुद्ध राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले स्वीकृत नगरसेवक भगवती शर्मा ( जैन आणि शर्मा गेल्या निवडणुकीतही आमनेसामने लढले होते त्यात जैन विजयी झाले होते) यांच्यात सामना रंगणार आहे.
  • प्रभाग ‘८ ब’मध्ये भाजपमधून शिवसेनेत गेलेल्या प्रतिभा तांगडे-पाटील विरुद्ध काँग्रेसच्या झीनत कुरेशी, प्रभाग ८ क मध्ये भाजपचे स्वीकृत नगरसेवक सुशील अगरवाल विरुद्ध काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले सुहास रकवी, ‘७ अ’मध्ये भाजपचे मॉरस रॉड्रिग्ज विरुद्ध माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले स्टीवन मेन्डोन्सा असा सामना रंगणार आहे.
  • राई, मुर्धा आणि मोर्वा या प्रभागात ‘२३ क’मध्ये भाजपच्या वर्षां भानुशाली, शिवसेनेच्या प्रणाली पाटील आणि सेनेने तिकीट नाकारल्याने राष्ट्रवादीतून नशीब अजमावणाऱ्या अनिता परमार अशा तीन नगरसेविकांमध्ये लढत होणार आहे.
  • उत्तनमध्येही काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेल्या शर्मिला बजागी विरुद्ध काँग्रेसच्या शबनम शेख अशी लढत पाहायला मिळणार आहे.