भाईंदर पालिकेतील उपक्रम; अधिकाऱ्यांना लवकरच प्रशिक्षण

भाईंदर : मीरा- भाईंदर महानगरपालिकेत आता  ऑनलाइन पद्धतीने माहिती अधिकार कार्यप्रणाली राबवण्यात येणार आहे. या संदर्भात महानगरपालिकेकडून राज्य शासनाच्या संकेतस्थळावर नोंदणी करण्यात आली असून लवकरच अधिकाऱ्यांना यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

मिरा भाईंदर महानगरपालिकेत ऑनलाइन पद्धतीने माहिती अधिकार कार्यप्रणाली रावबवली जात नसल्यामुळे अनेक माहिती अधिकर कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष पालिकेत यावे लागत होते. याशिवाय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर मीरा-भाईंदर महानगरपालिकेसंदर्भात माहिती अधिकार टाकला असता पैसे आकारले जात होते. मात्र, पालिकेची त्या संकेतस्थळावर नोंदणीच नसल्यामुळे ते अर्ज पालिकेला प्राप्तच होत नव्हते. त्यामुळे यासंदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते प्रवीण परमार वारंवार तक्रार करत असल्याने अखेर पालिकेकडून महाराष्ट्र शासनाच्या माहिती अधिकाराच्या संकेतस्थळावर नोंदणी करण्यात आली आहे. त्यासंदर्भात अधिकाऱ्यांना शिक्षणही देण्यात येणार असल्याचे काम सुरू असल्याची माहिती महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी राजकुमार  घरत यांनी दिली.