‘रोटीमेकर’द्वारे रुग्णांना गरम चपात्यांचा पुरवठा; यंत्र वापरणारे पहिले रुग्णालय

येथील प्रादेशिक मनोरुग्णालयातील स्वयंपाकघराच्या नूतनीकरणाचे काम सध्या सुरू आहे. रुग्णांना गरमागरम रुचकर स्वयंपाक मिळावा, यासाठी जिल्हा नियोजन समितीने नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत त्यासाठी ३५ लाख रुपयांचा निधी दिला आहे. त्यातून रुग्णालयाच्या स्वयंपाकघरात अत्याधुनिक साधने कार्यान्वित केली जात असून त्यात रोटीमेकरचाही समावेश आहे. त्यामुळे मनोरुग्णांना यंत्राद्वारे केल्या जाणाऱ्या गरमागरम चपात्या मिळणार आहेत. अशा प्रकारचे रोटीमेकर वापरणारे हे राज्यातील पहिले रुग्णालय ठरणार आहे.

येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात दरदिवशी साधारण १५५० रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. या सर्व रुग्णांच्या राहण्याची तसेच जेवणाची सोय येथे केली जाते. रुग्णालयातील स्वयंपाकघरात ३६ आचारी कार्यरत आहेत. सकाळ-संध्याकाळच्या मिळून येथे सहा हजार चपात्या लागतात. त्यामुळे आचाऱ्यांना बराच खटाटोप करावा लागतो. भल्या पहाटे त्यासाठी तयारी करावी लागते. त्यामुळे रुग्णांना गरमागरम पोळी मिळत नाही. मनोरुग्णालयाचे अधीक्षक राजेंद्र शिरसाठ यांनी ही खंत तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांच्याकडे व्यक्त केली. त्यांनी त्वरित पावले उचलून येथील स्वयंपाकगृह सुधारण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण उपक्रमातून ३५ लाख रुपये मंजूर केले. त्यातून रुग्णालयात अर्धस्वयंचलित पद्धतीची रोटीमेकर यंत्रणा बसविण्यात येत आहे. त्याद्वारे एका तासात एक हजार पोळ्या तयार केल्या जाऊ शकतात. याशिवाय स्वयंपाकघर दुरुस्तीची कामेही या निधीतून केली जाणार आहेत, अशी माहिती शाखा अभियंता महेश लाड यांनी दिली.