चार रुग्णालयांकडून ३३ रुग्णांना रक्कम परत

ठाणे : करोनाबाधित रुग्णांकडून जास्त देयक वसूल केल्याप्रकरणी होराईझन प्राईम या खासगी रुग्णालयावर कारवाई करण्यात आली असतानाच महापालिकेच्या आदेशानंतर शहरातील खासगी कोविड रुग्णालयांनी सोमवारपासून रुग्णांना जास्तीची रक्कम परत देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सोमवारी दिवसभरात चार रुग्णालयांनी ३३ रुग्णांना एक लाख ६५ हजारांची रक्कम परत केली आहे.

करोनाबाधित रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत आणि त्यांचे प्राण वाचावेत या उद्देशातून महापालिका प्रशासनाने आतापर्यंत शहरातील १८ खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णालयांची मान्यता दिली आहे. मात्र, यापैकी काही रुग्णालयांकडून अवाजवी देयके आकारून रुग्णांची लूटमार केली जात असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने नेमलेल्या लेखापरीक्षक विभागाच्या विशेष पथकाने ४८६ देयकांची तपासणी करून त्यापैकी १९६ आक्षेपित देयकांची नोंद केली होती. ही रक्कम २७ लाखांपेक्षा जास्त होती. या रुग्णालयांना नोटिसा बजावून स्पष्टीकरण देण्याचे आदेश आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिले होते. स्पष्टीकरणानंतरही शहानिशा करून त्यात जास्त रक्कम वसूल केल्याचे आढळून आले तर ती जास्तीची रक्कम संबंधित रुग्णांच्या खात्यात परत करण्याचे आदेश त्यांनी दिले होते.  ही प्रक्रिया पूर्ण करून लेखापरीक्षक विभागाच्या पथकाने रुग्णांकडून वसूल करण्यात आलेल्या जास्त देयकांच्या रकमेची यादी तयार केली असून त्याद्वारे संबंधित रुग्णालयांनी सोमवारपासून जास्तीची रक्कम रुग्णांना परत करण्यास सुरुवात केली आहे.

रुग्ण संख्या आणि जास्तीच्या रकमेची आकडेवारी

रुग्णालयांची नावे              रुग्ण संख्या     परत केलेली रक्कम

होराईझन प्राईम                   २१                       २३,२५०

ठाणे हेल्थ केअर                     ९                      १,२०,६२५

मेटोपॉल                                 १                      ८,२५०

लाईफकेअर                            २                      १३,०००

एकूण                                   ३३                       १,६५,१२५