ठाण्यातील कळवा खाडी येथील साकेत ब्रिज येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आलेल्या मुंब्रा येथील मोहमंद रफीक खान याची हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याचे शनिवारी उघड झाले. या हत्येमधील आरोपी अजगरअली हसन ठाकूर ऊर्फ अज्जू (३०) आणि सलीम अब्दुल अजिज शेख (३५) या मुंब्रा येथे राहणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या आरोपींना कापुरबावडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून दोघांनाही न्यायालयाने ५ सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.कळव्यातील साकेत ब्रिज परिसरामध्ये गुरुवारी पहाटे मुंब्य्रातील मोहंमद रफी इम्तियाज खान ऊर्फ शबर गोळ्या लागून जखमी अवस्थेत पोलिसांना सापडला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी कापुरबावडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी ठाणे गुन्हे शाखेने समांतर तपास करीत या प्रकरणातील आरोपींना अटक केली.मोहमद याचे याच भागात राहणारा कुविख्यात गुन्हेगार अजमरअली ऊर्फ अज्जू याच्याशी जुने भांडण होते. त्यातूनच ही हत्या झाल्याचा पोलिसांना संशय होता. त्यानुसार पोलिसांनी अज्जू यास मुंब्रा येथील अंबर हॉटलसमोर अटक केली. त्याने या हत्येची कबुली देत त्याचा अन्य साथीदार सलीम याच्या रिक्षातून मोहंमद याला पहाटे साकेत ब्रिजजवळ नेले. तेथे गावठी कट्टय़ाने त्याच्या छातीत दोन गोळ्या झाडल्याचे कबूल केले. जखमी मोहमदला साकेत टॉवरकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर फेकून आरोपी अज्जू आणि सलीम यांनी पळ काढला, अशी माहिती पोलीस तपासामध्ये उघड झाली आहे. आरोपी अजगर अली याच्याकडून हत्येसाठी वापरलेला गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे आणि एक पुंगळी हस्तगत करण्यात आले आहे. अजगरअली हा गुन्हेगारी पाश्र्वभूमीचा असून त्याच्यावर यापूर्वी खुनाचा प्रयत्न, दरोडय़ाचा प्रयत्न, घरफोडी, चोरी, जबरी दुखापत, अग्निशस्त्र बाळगणे, रेल्वेत चोरी करणे यांसारखे गुन्हे दाखल असून त्याला अटकही करण्यात आले आहे. अजगर अली आणि सलीम या दोन्ही आरोपींना कापुरबावडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांना ५ सप्टेंबपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.