28 February 2020

News Flash

Video: उल्हासनगरात भररस्त्यात एकाची हत्या

पाठलाग करून त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात दीपक गंभीर जखमी झाला.

(संग्रहित छायाचित्र)

उल्हासनगर : दिवसेंदिवस गुन्हेगारीचा आलेख वाढत असलेल्या उल्हासनगर शहरात सोमवारी पाच ते सहा जणांच्या टोळक्याने माणेरे गावात राहणाऱ्या दीपक भोईर या व्यक्तीचा पाठलाग करून धारदार शस्त्राने हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्येचा हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमध्येही चित्रित झालेला आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पूर्व वैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.

उल्हासनगरच्या कॅम्प दोन भागात असलेल्या धीरू बारसमोरच्या रस्त्यावर पाच ते सात जणांच्या टोळक्याने दीपक भोईर या व्यक्तीची धारदार शस्त्राने हत्या केली. हत्येपूर्वी दीपक याला एका तरुणीने दूरध्वनीवरून संपर्क साधून धीरू बारजवळ बोलवून घेतले होते असा आरोप दीपकच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्या तरुणीला भेटल्यानंतर दीपक घरी निघाला असता तेथे दबा धरून बसलेल्या पाच ते सहा जणांच्या टोळक्याने दीपकवर हल् ला केला. आपला बचाव करत असताना दीपकने पळ काढला. मात्र टोळक्याने त्याचा पाठलाग करून त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात दीपक गंभीर जखमी झाला. त्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळाहून पळ काढला. या घटनेनंतर दीपकला तातडीने उपचारांसाठी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही हत्या दीपक याच्या परिचयाच्या नरेश ऊर्फ बबल्या याने केली असल्याची माहिती उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जावळे यांनी दिली. रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हत्येचा हा प्रकार चित्रित झाला असून यातील इतर आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

First Published on January 22, 2020 2:46 am

Web Title: murder on road in ulhasnagar murder in ulhasnagar zws 70
Next Stories
1 खरेदीसोबत बक्षिसे जिंकण्याची संधी
2 ठाणे महापालिकेच्या शाळांत ९१ शिक्षकांची कमतरता
3 केन कॉर्सो श्वान स्पर्धा पुरस्काराचा मानकरी
Just Now!
X