पोलीस मारहाण प्रकरणाला नवे वळण

भाईंदर : मद्यधुंद अवस्थेतील तरुणांनी पोलिसांना केलेल्या मारहाण प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. पोलिसांनी आरोपींच्या घरातून गांजा हा अमली पदार्थ जप्त केल्याने या ठिकाणी केवळ मद्य पार्टी नव्हे तर रेव्ह पार्टी सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. याव्यतिरिक्त पोलिसांना मारहाण करताना चित्रीकरण करण्यात आलेला मोबाइल तसेच कामोत्तेजना वाढवणाऱ्या गोळ्यादेखील घरात मिळाल्याने एकंदरच या रेव्ह पार्टीचे भयानक स्वरूप समोर आले आहे.

मंगळवारी पहाटे मीरा रोडच्या पूनम गार्डन परिसरातील समृद्धी या इमारतीत मद्य पार्टीच्या नावाखाली सुरू असलेला धांगडधिंगा थांबवण्यासाठी गेलेल्या तीन पोलिसांना बंदिस्त करून मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणात दोन महिलांसह एकंदर १४ जणांना पोलिसांनी अटक केली होती. दोन दिवस आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांनी पार्टी सुरू असलेल्या घराची पुन्हा एकदा झडती घेतली. त्यावेळी घरातील चप्पल ठेवण्याच्या कपाटात ५०.३ ग्रॅम इतका गांजा आढळून आला, तसेच त्या ठिकाणी एक मोबाइलही लपवलेला दिसून आला. आरोपी पोलिसांना मारहाण करत असताना तसेच त्यांचे कपडे फाडत असतानाचे चित्रीकरण या मोबाइलमध्ये करण्यात आले होते. यासोबत धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांना घरात कामोत्तेजना वाढवणाऱ्या गोळ्यांचे एक पाकीटही मिळाले असल्याची माहिती मीरा रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्धे यांनी दिली.

उच्चभ्रू कुटुंबांतील तरुणांच्या पाटर्य़ामध्ये मद्य, अमली पदार्थ तसेच नशा आणणाऱ्या विविध पदार्थाची रेलचेल असल्याचे अनेक प्रकरणात उघडकीस आले आहे. अशा पाटर्य़ाना रेव्ह पार्टी संबोधले जाते. मीरा रोड येथील समृद्धी इमारतीत सुरू असलेल्या या पार्टीमध्येदेखील हुक्का, विदेशी मद्य तसेच अमली पदार्थाचा वापर झाला असल्याने ही पार्टीही रेव्ह पार्टीच असल्याचे स्पष्ट होत आहे. या घरात अनेक वेळा पाटर्य़ा होत असत, तसेच प्रत्येक वेळी मोठय़ा आवाजात गाणी लावून धांगडिधगा चालत असे, रहिवाशांनी तक्रार केल्यास त्यांच्यावर दादागिरी केली जात असल्याचे इमारतीमधील रहिवाशांनी सांगितले.

अमली पदार्थ व्यवहाराशी संबंध?

पार्टीमध्ये आणलेले अमली पदार्थ आरोपींनी कसे मिळवले, त्यांचे अमली पदार्थ विक्रेत्यांशी संबंध आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत. मीरा रोड परिसरात अमली पदार्थ व्यवहारांशी संबंधित अनेक व्यक्ती राहात असून आरोपींना अटक झाल्यानंतर या व्यक्ती मीरा रोड पोलीस ठाण्याच्या आवारात उपस्थित झाल्या होत्या, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.