बदलापूर नगरपालिकेत शिवसेना-भाजपची सत्ता असताना मागील २० वर्षांत शहराची कशा प्रकारे दुर्दशा झाली याचे दर्शन घडविणारे छायाचित्र प्रदर्शन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने येथे भरविले आहे.
नगरपालिका कार्यालयाजवळ शहरातील अपुरी विकासकामे तसेच विविध प्रभागांमध्ये रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ांची छायाचित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. कुठे नेऊन ठेवले आहे बदलापूर माझे, असे शीर्षक या प्रदर्शनाला देण्यात आले असून निवडणुकीच्या हंगामात या प्रदर्शनामुळे सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत.  
या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन निवृत्त न्यायाधीश अरुण शिसोदे यांच्या हस्ते करण्यात आले. युतीच्या कार्यकाळात शहरातील विकासकामांची दुरवस्था तसेच अर्धवट अवस्थेत असलेली कामांची नुकतीच काढलेली छायाचित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. बदलापुरात सत्ताधाऱ्यांनी केलेल्या अक्षम्य चुका व प्रशासनाची कामातील कुचराई यामुळे शहराची ही अवस्था झाली आहे, अशी टीकाही राष्ट्रवादी काँग्रेसने यावेळी केली आहे. चार दिवस चाललेले हे प्रदर्शन आता बदलापूर स्थानकाजवळील स्काय-वॉक येथे मांडण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष कालिदास देशमुख यांनी दिली.

मंडयांची धूळधाण
या प्रदर्शनातील छायाचित्रांमधून शहरातील भाजी मंडई, मासळी बाजाराच्या वास्तूंची कशी धुळधाण उडाली आहे हे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नव्याने सुरू झालेल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर पडलेले तडेदेखील छायाचित्रांच्या माध्यमातून दाखविण्यात आले आहेत. तसेच बदलापुरातील बहुतांश उद्याने ही बंद पडलेल्या अवस्थेत असून येथील लहान मुलांची खेळणी गंजली आहेत. या दुरवस्थेचे दर्शनही या माध्यमातून घडविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.