जितेंद्र आव्हाड यांचे मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र
ठाणे महापालिकेने दहीहंडी आयोजकांसाठी नियमांची चौकट आखून दिली असतानाच शिवसेनेने मात्र रस्ते अडवून मंडप उभारून उत्सव साजरा केला. ध्वनिक्षेपकांच्या आवाजाची मर्यादा राखण्याचे आदेशही पायदळी तुडवले गेले. या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करत या वादाला राजकीय फोडणी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या संमतीनेच सत्ताधारी पक्षाशी संबंधित मंडळांकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करण्यात आल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे.
शिवसेना नेत्यांच्या उत्सवातील ढणढणाटाकडे पोलीस आणि महापालिकेने केलेल्या दुर्लक्षामुळे ठाण्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. न्यायालयाने आखून दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी करा यासाठी शुक्रवापर्यंत पोलीस आग्रही होते. मात्र, न्यायालयाच्या र्निबधामुळे उत्सवांच्या आयोजनावर आलेल्या मर्यादा सरकारच्या अंगलट येत आहेत हे लक्षात येताच गेल्या तीन महिन्यांपासून या प्रश्नावर भूमिकाहीन असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पोलिसांकरवी उत्सव साजरे करून घेतले, असा खळबळजनक आरोप आव्हाड यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला. ध्वनिप्रदूषण झाले तर गुन्हे दाखल केले जातील, असा दम ध्वनिक्षेपक ठेकेदारांना भरण्यात येत होता. काही मंडळांना मंडप उभारण्यास परवानगी नाकारण्यात आली. यामुळे दहीहंडी आयोजनासंबंधी संभ्रमाचे वातावरण होते. हे सगळे सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी बघ्याची भूमिका घेतली. मात्र, हिंदूू सणांवर र्निबध टाकले जात असल्याची टीका होऊ लागल्याने जागे झालेल्या मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना हाताशी धरून उत्सव साजरे करून घेतले, असा आरोपही त्यांनी केला. टेंभी नाका, जांभळी नाका येथे शिवसेना नेत्यांनी रस्ते अडवून साजरे केलेल्या उत्सवांना कशी परवानगी देण्यात आली, असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला.