भारतीय हवामान खात्याने दिलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या इशाऱ्यानंतर जिल्हा प्रशासनासह कोस्ट गार्ड, पोलीस यंत्रणा, गाव पातळीवरील यंत्रणा अशा सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. वादळाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील किनारपट्टी भागात एनडीआरएफच्या टीम तैनात केल्या असून पालघरमध्येही या वादळाच्या पूर्वतयारीसाठी एनडीआरएफच्या टीम सज्ज झाली असून तयारीला लागली आहे.

आज(दि.३) पालघरच्या किनारपट्टीवर धडकणाऱ्या संभाव्य वादळाच्या पार्श्‍वभूमीवर एखादी आपत्ती ओढवल्यास या एनडीआरएफ मोठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. यामुळे सकाळपासूनच किनारपट्टीसह सर्व ठिकाणी तैनात असलेल्या एनडीआरएफच्या टीमने आपली सर्वतोपरी तयारी केली आहे. पालघर शहरात असलेल्या राखीव एनडीआरएफच्या टीमने लागणारे सर्व यंत्र सामग्री तपासून घ्यायला सुरुवात केली असून या वादळात कुठेही आपत्ती ओढवल्यास आपल्या सुसज्ज यंत्रणेसह हे एनडीआरएफचे जवान आवश्यक असलेल्या ठिकाणी पोचू शकणार आहेत.

एनडीआरएफच्या टीम संपूर्ण यंत्रणेसह सुसज्ज असून आपत्ती व्यवस्थापनासंबंधीच्या सर्व त्या यंत्रणा त्यांच्याकडे तयार ठेवलेल्या आहेत. किनारपट्टीलगत आमच्या इतर टीम असल्या तरी आवश्यक ठिकाणी गरज भासल्यास राखीव टीम त्या ठिकाणी कोणताही विलंब न लावता सर्व साधन सामग्रीसह तात्काळ पोहोचेल असे या जवानांनी सांगितले.