महापालिकेकडून अजून पाणीपुरवठा नाही

विरार : मुबलक पाणी असल्याचा दावा वसई-विरार महापालिकेकडून केला जात असताना नालासोपारा परिसरातील शेकडो इमारती आजही तहानलेल्या आहेत. पाण्यासाठी त्यांना महिन्याला हजारो रुपये खर्च करून आपली तहान भागवावी लागत आहे. विकतचे पाणी घ्यावे लागत असल्याने या परिसरात टँकरमाफियाही आपले पाय रोवत आहेत.

नालासोपारा पूर्वेतील प्रगतीनगर परिसरात शेकडो इमारती गेल्या १० वर्षांत उभ्या राहिल्या आहेत. या इमारती वसवताना महापालिकेने कानाडोळा केला. आता या इमारतींमध्ये लाखो रुपये खर्च करून अनेकांनी घरे घेतली, तर महापालिकेकडून पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल, असे आश्वासन विकासकांनी दिले. पण आता तब्बल १० वर्षांचा काळ उलटला; परंतु एकाही इमारतीला महापालिकेची नळजोडणी मिळालेली नाही. उलट १० वर्षांपासून त्यांना टँकरने पाणीपुरवठा करून विकासक आणि टँकरमाफिया यांनी मोठी माया जमवली आहे. या परिसरात पाण्यासाठी मासिक ८०० ते १००० रुपये विकासक प्रत्येक घरातून घेत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

प्रगतीनगर परिसरात ४५०० मतदार आहेत. पण प्रत्येक निवडणुकीत त्यांना पाण्याचे आश्वासन देऊन मते पदरात पडून घेण्याचे काम राजकीय पुढारी करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. सुमारे १० हजारांहून अधिक लोकवस्तीचा हा परिसर आजही आपली तहान टँकरच्या पाण्यावर भागवत आहेत. टँकरद्वारे केला जाणारा पाणीपुरवठा पिण्यास योग्य नसल्याने या परिसरातील नागरिकांना आरोग्याचे प्रश्न सतावत आहेत. असे असतानाही वसई विरार महापालिका या नागरिकांना पाण्याची व्यवस्था करून देत नाही. काही ठिकाणी सार्वजनिक पाण्याचे नळ जोडण्यात आले आहेत, पण त्यावर पाणी मिळण्यासाठी अनेक तास रांगेत उभे राहावे लागते, असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. या परिसराला लवकरच नळजोडणी दिली जाणार आहे, अशी माहिती महापालिकेचे सहायक आयुक्त विजय चव्हाण यांनी दिली.

या परिसरात जलवाहिन्या नव्हत्या. त्यामुळे या ठिकाणी पाणी देता येत नव्हते. आता जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. लवकरच या परिसरात पाणी देण्यास सुरुवात होईल. – माधव जवादे, शहर अभियंता, वसई-विरार महापालिका