लोकसत्ता प्रतिनिधी

अंबरनाथ : गेल्या काही महिन्यांपासून पाणीटंचाईच्या झळा सहन करणाऱ्या अंबरनाथ शहरातील नागरिकांना आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाण्याचा आधार मिळाला होता. मात्र, त्यात गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिन्यांना बसवण्यात आलेले मीटर नादुरुस्त झाल्याने अंबरनाथ पूर्व येथील नागरिकांना पुन्हा पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मीटर दुरुस्तीच्या कामात वेळ लागल्याने पाणीपुरवठय़ावर परिणाम झाल्याची कबुली जीवन प्राधिकरणाच्या अभियंत्यांनी दिली आहे.

अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणारे जलस्रोत जुलै महिन्याच्या अखेरीस तुडुंब भरून वाहू लागले होते. असे असतानाही शहराला त्यातही पूर्व भागात पाणीपुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणातून पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. राजकीय पक्षांनी सातत्याने मागणी केल्यानंतर महिनाभरापूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने चिखलोली धरणातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र धरणातून पुन्हा दूषित पाण्याचा पुरवठा होऊ  लागल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कारभारावर टीका होत असल्याने अखेर गेल्या महिन्यात जीवन प्राधिकरणाने पूर्व भागाला होणारा पाणीपुरवठा बंद केला होता. त्याबदल्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळच्या माध्यमातून अतिरिक्त पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला होता. या पाणीपुरवठय़ाला काही दिवस उलटत नाही तोच अंबरनाथ पूर्व येथील नागरिकांना पुन्हा पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

एमआयडीसी प्रशासनाकडून अंबरनाथ पूर्वेला केला जाणारा पाणीपुरवठा एक दिवसाआड केला जातो. त्यामुळे आधीच नागरिक पाणीटंचाईचा सामना करत आहेत. त्यात गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिन्यांना बसविण्यात आलेले पाण्याचे मीटर नादुरुस्त झाल्याची बाब समोर आली. या दुरस्ती कामामुळे पूर्व भागातील नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. आधीच एक दिवसाआड पाणी, त्यात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे पाण्याचे नियोजन कोलमडले. सलग चार दिवस पाण्याचा प्रश्न उद्भवल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. मुख्य जलवाहिन्यांच्या नादुरुस्त मीटरच्या दुरुस्तीसाठी मोठा वेळ लागल्याने पाणीपुरवठय़ावर परिणाम झाल्याची कबुली प्राधिकरणाच्या अभियंत्यांनी दिली. त्यामुळे जीवन प्राधिकरणाच्या कारभारावर पुन्हा संताप व्यक्त केला जात आहे.

‘जीवन प्राधिकरण कशासाठी?’

शहरातील नव्याने उभ्या राहणाऱ्या गृहसंकुलांना पाणीपुरवठा करण्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मर्यादा समोर येत आहेत. असे असतानाच जीवन प्राधिकरण एमआयडीसीच्या पाण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करीत आहे, तर शहरातील टंचाईच्या भागात पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसीच्या पाण्यामुळे नागरिकांना आधार मिळत असतानाच मीटरच्या घोळामुळे त्यातही खंड पडत असल्याने पाणीपुरवठय़ाची जबाबदारी असलेले जीवन प्रधिकरण नक्की आहे कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.