तंत्रज्ञानातील प्रगतीचा अवलंब शिक्षणपद्धतीत करण्याच्या प्रयत्नांना आणखी बळ देत डोंबिवलीच्या मानपाडा परिसरातील विद्यानिकेतन शाळेने व्यवस्थापन आणि पालकांच्या थेट संवादासाठी स्वतचे अ‍ॅप विकसित केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून शाळेत दररोज घडणाऱ्या घडामोडी पालकांपर्यंत पोहचण्याची व्यवस्था उपलब्ध केली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीपासून शाळेतील विविध उपक्रमांची माहिती या अ‍ॅपच्या माध्यमातून पालकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. येत्या १ सप्टेंबरपासून हे अ‍ॅप सुरू करण्यात येणार असल्याचे शाळेचे संचालक अतुल पंडित यांनी सांगितले.
स्मार्टफोनच्या माध्यमातून अवघ्या जगाच्या घडामोडी तळहातावरील उपकरणात दिसत असताना पालकांना आपला पाल्य शाळेत काय करतो, त्याची शैक्षणिक प्रगती कशी आहे, हे जाणून घेण्यासाठी शाळा गाठावी लागते. नेमका हाच धागा पकडून विद्यानिकेतन संस्थेचे संस्थापक विवेक पंडित यांनी शाळेचे अ‍ॅप विकसित करण्याचा निर्णय घेतला. डोंबिवलीतील तंत्रज्ञ निनाद देसाई यांच्या माध्यमातून हे अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे.
या अ‍ॅपमुळे शाळा व्यवस्थापन, शिक्षक आणि पालक यांच्यातील संवाद सुकर होईल, असा दावा व्यवस्थापनाने केला आहे.  अ‍ॅपमुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामधील प्रशासकीय संवाद, निरोप देणे, कागदपत्रांसाठी जी धावपळ करावी लागते, ती टळेल, असे अतुल पंडित यांनी सांगितले.असे असेल अ‍ॅप

’या योजने अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांला ओळख क्रमांक दिला जाईल. हा ओळख क्रमांक संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांच्या अ‍ॅपचा पासवर्ड असेल.

’या अ‍ॅपमध्ये वर्गवार माहिती, शाळेचे वेळापत्रक, विद्यार्थ्यांना केलेल्या सूचना, शाळेतील उपक्रम, त्यांची छायाचित्रे पाहायला मिळतील.

’विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, गृहपाठ, शिक्षकांची माहिती अ‍ॅपवरून सहज उपलब्ध होईल.

’या अ‍ॅपमागे दरमहा दहा रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.