काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दहीहंडी तसेच गणेशोत्सवांच्या पाश्र्वभूमीवर ठाणे पोलिसांनी ध्वनिप्रदुषणाचे नियम न पाळणाऱ्या डीजेमालकांचे साहित्य जप्त करण्याचा इशारा दिल्याने डीजे मालकांचे धाबे दणाणले असून त्यांनी यंदा उत्सवांतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे यंदा उत्सवात ध्वनिवर्धक आणि डीजेंचा दणदणाट ऐकायला मिळणार नसल्याने जनसामान्यांतून याचे स्वागत होत आहे.
ठाणे शहरातील वेगवेगळ्या भागांतील मुख्य तसेच अंतर्गत रस्ते अडवून उत्सवांसाठी मंडप उभारले जातात. यामध्ये राजकीय पक्षांशी संबंधित मंडळे आघाडीवर असल्याने पोलीस किंवा प्रशासनालाही मूग गिळून गप्प बसावे लागते. एकीकडे अशा मंडपांमुळे वाहतुकीस अडथळा होत असतानाच या मंडपांजवळ लागणाऱ्या मोठमोठय़ा आवाजातील ध्वनिवर्धकांमुळे ध्वनिप्रदूषणाचाही त्रास स्थानिकांना सोसावा लागतो. सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीच्या मर्यादेबाबत नियम आखून दिले असतानाही उत्सवादरम्यान त्याचे उल्लंघन केल्याचे दिसून येते. मात्र यंदा उत्सवांबाबत उच्च न्यायालयाने जारी केलेल्या आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय पोलीस व महापालिका प्रशासनांनी केला आहे. ठाणे पोलिसांनी शहरातील डीजे मालकांची बैठक घेतली असून त्यामध्ये आवाजाच्या पातळीची मर्यादा ओलांडल्यास सहा महिन्यांसाठी ध्वनिक्षेपकाचे साहित्य जप्त करण्यात येईल किंवा तीन वर्षे कारावास किंवा पाच लाख रुपये दंड अशी शिक्षा होईल, अशी तंबी दिली आहे. त्यामुळे डीजे मालकांचे धाबे दणाणले असून त्यांनी  उत्सवांकरिता डीजेचे साहित्य न पुरविण्याचा निर्णय घेतला आहे.मुंबईमध्ये सण व उत्सव साजरे करण्यासाठी सर्व परवानग्या तसेच ना-हरकत प्रमाणपत्रे विना अटी-शर्ती दिली जात आहेत. मात्र ठाण्यात पोलीस जाचक अटी लादत आहेत. त्यामुळे आम्ही उत्सवांतून माघार घेत आहोत, अशी भूमिका ठाणे जिल्हा लाऊडस्पीकर मालक वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष दीपक चाफेकर यांनी मांडली.
निर्णय स्वागतार्हच
उत्सवांना ध्वनिक्षेपक साहित्य न पुरविण्याचा डीजे मालकांचा निर्णय स्वागतार्हच आहे. एकंदरीतच समाजाच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा पोषक निर्णय आहे. सण-समारंभांच्या वेळी केवळ भावनेत न गुरफटता डीजेची आपल्याला गरज आहे का?
– गिरीश आष्टेकर, नागरिक

सकारात्मक निर्णय
सार्वजनिक उत्सवांमध्ये आयोजकांकडून डीजे मालकांना भरपूर मोबदला मिळतो. मात्र, पोलिसांच्या कारवाईमुळे साहित्य जप्त होणार असल्याने डिजे मालक उत्सवांमधून माघार घेत आहेत. हेच यामागचे प्रमुख कारण आहे.
विमुक्ता राजे, नागरिक