कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या शाळांची स्थिती किती केविलवाणी आहे याचा प्रत्यय पालिकेची ‘शाळा क्रमांक १२’ पाहून येतो. उर्दू माध्यमाच्या या शाळेत पाहिली ते चौथीच्या दीडशे विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी केवळ एकच शिक्षिका गेले वर्षभर राबत आहे. नगरपरिषद शाळांसाठी असलेल्या शासकीय निकषांप्रमाणे या शाळांमध्ये चार शिक्षक, एक मुख्याध्यापक आणि एका शिपायाची गरज असताना अवघ्या एका शिक्षिकेलाच हा भार सोसावा लागत असल्याचे चित्र आहे.
नगरपालिकेने नुकताच पालिका शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वागतोत्सव हा कार्यक्रम केला होता. परंतु, बदलापूर गाव येथील या उर्दू शाळेत दीडशे विद्यार्थ्यांसाठी फक्त एकच शिक्षिका स्वागताला असल्याने त्यांची तारांबळ उडाली आणि या भयानक स्थितीचा उलगडा झाला. येथील ज्येष्ठ नगरसेवक मसूद कोहारी यांनी याबाबत पालिकेकडे व शिक्षण विभागाकडे वारंवार मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. उर्दू शाळा असल्याने पालिका प्रशानाकडून  दुजाभाव होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

* बदलापूर गावात मुस्लिम समाजाची  संख्या मोठी असून या शाळेत दरवर्षी १५० ते १६० विद्यार्थी पहिलीला प्रवेश घेतात.
* गेल्या चार वर्षांपासून येथे एक शिक्षण सेविका आणि एका शिक्षिकेच्या जिवावरच  ही शाळा चालवली जात आहे.
* या एकटय़ाच शिक्षिकेला चारही वर्गाची जबाबदारी सांभाळावी लागतेच, पण त्याबरोबरीने त्यांना शिपाई, मुख्याध्यापक, लिपिकाची कामे, शाळेच्या सभा, पेपर तपासणी, निवडणूक, पोषण आहार, पालकांना सभा यांसह इतरही कामे करावी लागत आहेत.

एकाच शिक्षिकेला अध्यापनाबरोबरच अन्य कामे करावी लागत असल्याने त्याचा परिणाम शाळेच्या विद्यार्थ्यांवर होत आहे. नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असून, या ठिकाणी लवकरात लकवर अन्य शिक्षकांची नेमणूक होणे गरजेचे आहे.
– मसूद कोहारी, स्थानिक नगरसेवक