पी. डी. कारखानीस महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या निवासी शिबिरादरम्यान मुरबाड तालुक्यातील पऱ्हे गावात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली दोन वनराई बंधारे बांधून जलसंवर्धनाचे धडे गिरवले. त्यांच्या या उपक्रमामुळे पावसाळ्याव्यतिरिक्त पाण्याची चणचण भासणाऱ्या पऱ्हे गावाला रब्बी हंगामासाठी पाणी उपलब्ध झाले आहे.

मुरबाडपासून २५ किलोमीटर अंतरावर असलेले पऱ्हे गाव प्रामुख्याने पारंपरिक शेती व्यवसायावर अवलंबून आहे. शेतीतही भाताव्यतिरिक्त इथे फारसे काही पिकविले जात नाही. कारण पावसाळ्यानंतर गावात पिण्याचे पाणी मिळणेच दुरापस्त असते. त्यामुळे राष्ट्रीय सेवा शिबिराच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून गावात दोन वनराई बंधारे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. जलवर्धिनी प्रतिष्ठानचे उल्हास परांजपे यांनी विद्यार्थ्यांना जलसंवर्धनाविषयी मार्गदर्शन केले. त्यानुसार परिसरातील दोन ठिकाणी असलेले वाहते जलप्रवाह वनराई बंधारे बांधून अडविण्यात आले.

गावातील किमान २०० एकर जागा त्यामुळे ओलिताखाली येऊ शकणार आहे. या जमिनीवर पावसाळ्याव्यतिरिक्त काहीच पिकत नव्हते. आता पाणी उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांना रब्बी हंगामातही एखादे पीक घेता येऊ शकेल. त्याबरोबरच विद्यार्थ्यांनी परिसरातील गावांचे सर्वेक्षण करून तेथील जीवनमानाविषयी सविस्तर माहिती घेतली. या शिबिराला जोडूनच रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ ईस्टच्या पुढाकाराने पऱ्हे महोत्सव भरविण्यात आला आहे. त्यात आरोग्य शिबीर, युवकांसाठी क्रीडा स्पर्धा, महिलांसाठी पाककला स्पर्धा, शेतकरी मेळावा, आरोग्य शिबीर आदी उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. महोत्सवाची सांगता ३० डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी, स्थानिक आमदार किसन कथोरे, आमदार डॉ. बालाजी किणीकर आदींच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती रोटरीचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी दिली.