पक्षाच्या कार्यकर्त्यांकडेच जास्त ‘टोकन’

अंबरनाथ : राजकीय वशिल्याने लस घेणाऱ्यांमुळे सर्वसामान्यांना त्रास होत असल्याचे प्रकार गेल्या काही महिन्यांत समोर आले होते. त्यावर नियंत्रण मिळवल्यानंतर टोकन पद्धतीचा अवलंब केला गेला. मात्र आता या लशींच्या टोकनमध्येही राजकीय वाटमारी होत असल्याचे समोर आले आहे. रांगेत तासन्तास थांबणाऱ्या नागरिकांना टोकन मिळत नसताना अंबरनाथ शहरात काही माजी नगरसेवक आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयातून लशींचे टोकन वाटले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या टोकन पद्धतीवरही आता आक्षेप घेतले जात आहेत.

लसीकरणाच्या सुरूवातीच्या काळात लस घेण्याकडे नागरिकांनी पाठ फिरवली होती. मात्र गेल्या काही महिन्यांत लसीकरणाचे महत्त्व वाढले असून नागरिक लशींसाठी केंद्रावर गर्दी करत आहेत. काही महिन्यांपूर्वी लस देण्यात राजकीय वशिलेबाजी होत असल्याचे प्रकार समोर आले होते. अंबरनाथमध्येही लसीकरणात वशिलेबाजी होत असल्याचा आरोप केला जात होता. मात्र त्यावर उपलब्ध लस साठय़ानुसार टोकन पद्धत अवलंबली गेली. त्याची माहिती अंबरनाथ नगरपालिका दररोज प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देते. टोकन घेण्यासाठी आयुध निर्माणी आणि कै. बी. जी. छाया रुग्णालयात पहाटेपासूनच मोठय़ा रांगा लागतात. गेल्या काही दिवसांपासून रांगा लावूनही लस मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. नागरिकांना लशीचे टोकन मिळत नसताना शहरातील काही माजी नगरसेवक आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयातून नागरिकांना लशीचे टोकन वाटले जात असल्याचे समोर आले आहे. लशींचे टोकन मिळवत स्वत: लसीकरणाचे श्रेय घेतल्याच्या या प्रकारामुळे सर्वसामान्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या माजी नगरसेवकाचे आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्ते सकाळीच रांगेत लागून अधिकचे टोकन मिळवत असतात. त्यानंतर हेच टोकन पक्षाच्या नावाने वाटले जातात. त्यामुळे सर्वसामान्यांच्या हक्काच्या लशींच्या टोकनमध्ये होणाऱ्या राजकीय वाटमारीवर  टीका होते आहे.

लशींचा साठा मिळत नसल्याने आधीच आवडय़ातून दोन ते तीन दिवस लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. त्यात आता लसीकरणासाठीही राजकीय पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांवर अवलंबून राहायचे की काय असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहेत. अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुका प्रलंबित असल्याने लसींच्या माध्यमातून जनसंपर्क मोहीम राबवण्याचा प्रयत्न इच्छुकांकडून होतो आहे.लशीच्या टोकनचा राजकीय व्यक्ती गैरवापर करत असल्याचे कळते आहे. या घटना टाळण्यासाठी ज्या व्यक्तीचे आधारकार्ड त्याच व्यक्तीला लशीचे टोकन दिले जाईल. तर ज्या नावे टोकन त्याच व्यक्तीला लस दिली जाईल.

– डॉ. नितीन राठोड, नोडल अधिकारी, अंबरनाथ.