शिवसेना, मनसेचा विरोध

बदलापूर: बदलापूर शहरात गेल्या महिनाभरात करोना रुग्णांची निम्म्यावर आलेली संख्या, एक टक्क््यावर आलेला मृत्युदर आणि शहरातील रुग्णालयातील रिकाम्या असलेल्या खाटांच्या पाश्र्वभूमीवर शुक्रवारी उशिरा जाहीर झालेली कडक टाळेबंदी राजकीय प्रतिष्ठेपायी लावण्यात आल्याच्या चर्चा सध्या शहरात रंगल्या आहेत. शिवसेना, मनसेच्या वतीने शनिवारी टाळेबंदीच्या प्रस्तावावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले, तर टाळेबंदीच्या निर्णयावर नागरिकांमधूनही संताप व्यक्त होत होता.

बदलापूर शहरात एप्रिल महिन्यात करोनाचा उद्रेक पहायला मिळाला असला तरी गेल्या काही दिवसांपासून शहरातील रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाली आहे. असे असतानाही शनिवारपासून बदलापूर शहरात कडक टाळेबंदीची घोषणा ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केली. त्यापूर्वी गुरुवारीच आमदार किसन कथोरे यांनी शहरात शनिवारपासून टाळेबंदी लागू करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र टाळेबंदीच्या या घोषणेवर शुक्रवारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेच्या वतीने टीका करण्यात आली होती. टाळेबंदीच्या चर्चांनी शुक्रवारी शहरातल्या बाजारपेठेत गर्दी होती. त्यामुळे या गर्दीचे खापर शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी आणि अप्रत्यक्षपणे भाजप आमदार किसन कथोरे यांच्यावर फोडले.