ठाणेभूषण, गौरव, गुणीजन पुरस्कारांसाठी अजब अट; पालिकेची नियमावली वादात सापडण्याची चिन्हे

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ठाणेकरांच्या कार्याची पावती म्हणून देण्यात येणाऱ्या ठाणेभूषण, गौरव आणि गुणीजन या पुरस्कारांसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींची शिफारस बंधनकारक करण्याचा अजब निर्णय महापालिकेने घेतला आहे. या पुरस्कारांसाठीच्या निवडीत राजकीय हस्तक्षेप होत असल्याची चर्चा आधीपासूनच होत आहे. त्यानंतर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनीच यासंबंधी ठोस नियमावली आखण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, आता नगरसेवक, आमदार किंवा खासदारांचा ‘वशिला’ नसल्याने गुणीजनांना पालिकेच्या कौतुकास पात्रच ठरता येणार नाही, अशी परिस्थिती आहे.

ठाणे महापालिकेचा वर्धापन दिन दरवर्षी १ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. यानिमित्ताने महापालिकेमार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्याचबरोबर सामाजिक, सांस्कृतिक, कला-क्रीडा, शैक्षणिक, वैज्ञानिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात येते. ठाणेभूषण, गौरव, गुणीजन अशा पुरस्काराने अशा व्यक्तींना गौरविले जाते. या पुरस्काराची निवड प्रक्रिया गेल्या काही वर्षांपासून अनेकदा वादाचा मुद्दा ठरला आहे. पुरस्कारासाठी निवडण्यात आलेल्या व्यक्तीबाबत आक्षेप घेण्यात आल्यानंतर पालिकेला त्यांचे नाव वगळावे लागल्याचे प्रकारही यापूर्वी घडले आहेत. या पाश्र्वभूमीवर महापालिका प्रशासनाने पुरस्काराची निवड करण्यासाठी नियमावली तयार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार नियमावलींचा सविस्तर प्रस्ताव प्रशासनाने नुकताच तयार केला आहे.

या प्रस्तावानुसार पुरस्कारांसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तींना नगरसेवक, आमदार आणि खासदार यांची शिफारस बंधनकारक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पुरस्कारासाठी प्राप्त झालेल्या सर्व अर्जाची छाननी सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत करण्यात येणार आहे. सर्व पुरस्कारांसाठी महापौरांचा निर्णय अंतिम असेल, असेही नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे. शहरातील गुणीजनांची निवड गटनेत्यांच्या बैठकीत कशासाठी, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

विशेषत: एकंदर प्रक्रियेतील राजकीय हस्तक्षेप छुपा न राहता अधिक खुला होण्याचीही भीती व्यक्त होत आहे.  या पुरस्कारांसाठी व्यक्तींची निवड करताना विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींची समिती नेमली जावी, अशी मागणी यापूर्वीही केली जात आहे. असे असताना ही सर्व प्रक्रिया यापुढे राजकीय हस्तक्षेपाशिवाय शक्य नाही, अशीच रचना या प्रस्तावाच्या माध्यमातून पुढे आली आहे.

पुरस्कारांची संख्या

  • ठाणेभूषण – १
  • ठाणे गौरव – १५
  • ठाणे गुणीजन – ७०