घोडबंदर परिसरात मुख्य मार्गासह उड्डाणपुलांवर खड्डे; सेवा रस्त्यांना खेडय़ातील रस्त्यांचे स्वरूप

ठाणे : घोडबंदर येथील मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मार्गिका मेट्रोच्या कामामुळे अरुंद होऊन वाहतूक कोंडीची समस्या झाल्याने घोडबंदरवासीय हैराण झाले असून त्यापाठोपाठ आता या मार्गासह येथील उड्डाणपुलांवर पडलेल्या खड्डय़ांमधून घोडबंदरवासीयांना जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी उड्डाणपुलांवरील रस्त्यांची कामे करण्यात आली असतानाही त्या ठिकाणी खड्डे पडल्याने या कामावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तसेच महामार्गालगतच्या दोन्ही बाजूंच्या सेवा रस्त्यांची दुर्दशा झाली असून हे रस्ते खेडेगावातील रस्त्यांप्रमाणे असल्याचे दिसून येते.

घोडबंदर भागातून मुंबई-अहमदाबाद महामार्ग जातो. या भागातील वाहतुकीसाठी हा एकमेव मार्ग आहे. तसेच जेएनपीटी बंदरातून गुजरातच्या दिशेने जाणारी अवजड वाहने याच मार्गावरून वाहतूक करतात. या मार्गावर वाहनांचा भार वाढला आहे. त्यात मेट्रोच्या कामामुळे महामार्ग अरुंद झाल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली असून या समस्येमुळे घोडबंदरवासीय हैराण झाल्याचे चित्र आहे. असे असतानाच या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. माजिवाडय़ापासून ते गायमुखपर्यंत दोन्ही बाजूंच्या मार्गावर खड्डे पडले असून काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक उखडले आहेत. मार्गालगत सेवा रस्ते जागोजागी उखडलेले असून काही ठिकाणी पाण्याची डबकी साचली आहेत. हे रस्ते खेडेगावातील रस्त्यांप्रमाणे दिसत आहेत. या संदर्भात राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधला. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तसेच सेवा रस्त्यांच्या दुरवस्थेसंदर्भात महापालिकेचे नगर अभियंता रवींद्र खडताळे हे बैठकीत व्यस्त असल्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा

घोडबंदर भागातील अंतर्गत वाहतुकीसाठी पातलीपाडा, ब्रह्मांड, कोलशेत, ढोकाळी या भागांतील रस्त्यांचीही दुर्दशा झाली असून या रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यापैकी काही रस्त्यांवर मलनि:सारण प्रकल्पाची कामे करण्यात आली असून त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ता खचला होता. त्या ठिकाणी महापालिकेने डागडुजीची कामे केली होती. त्यानंतरही या रस्त्यांवरील खड्डे कमी झाले नसल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी खड्डय़ांमध्ये पाणी साचल्याने दुचाकीस्वारांना खड्डे दिसून येत नाहीत आणि त्यामध्ये त्यांची दुचाकी आदळण्याचे प्रकार घडतात.

दुचाकीस्वारांना धोका

घोडबंदर येथील मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील सिमेंट काँक्रीट आणि त्यालगत असलेल्या डांबरी रस्त्यांच्या जोडणीमध्ये चार ते पाच इंचांची पोकळी निर्माण झाली आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांच्या जोडणीतही अशाच प्रकारे पोकळी निर्माण झाली आहे. चार दिवसांपूर्वी कासारवडवली भागातील रस्त्यावरील निर्माण झालेल्या पोकळीमुळे दुचाकी घसरून वेदांत दास या पाचवर्षीय मुलाला जीव गमवावा लागल्याची बाब पोलीस तक्रारीतून पुढे आली आहे.