नागरिकांना वीज अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे;  तक्रारी प्राप्त झाल्या नसल्याचा महावितरणचा दावा

ठाणे : करोना टाळेबंदीच्या काळात म्हणजेच एप्रिल ते जून अशी तीन महिन्यांची एकत्रित पाठविण्यात आलेल्या सरासरी वीज देयकाचा भारणा केल्यास त्यावर दोन टक्के सवलत देण्याची घोषणा राज्याच्या ऊर्जा विभागाने केली होती. परंतु वीज देयकांचा भारणा केल्यानंतरही सवलत मिळत नसल्याचा आरोप ग्राहकांकडून करण्यात येत आहे. त्याचबरोबर याबाबत वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यानंतर त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचे ग्राहकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे वाढीव बिलांच्या तक्रारीनंतर आता दोन टक्के सवलतींचा गोंधळ असल्याचे चित्र आहे, तर अशा तक्रारी प्राप्त झाल्या नसल्याचा दावा महावितरणने केला आहे.

टाळेबंदीच्या काळात वीज कंपन्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन ग्राहकांच्या वीज मीटरचे वाचन करून नोंदी घेतल्या नव्हत्या. तसेच त्यांना वीज देयकेही वितरित केली नव्हती. त्यानंतर वीज कंपन्यांनी जून महिन्यात ग्राहकांना देयकाचे वितरण केले. त्यामध्ये एप्रिल आणि मे महिन्यांतील सरासरी वीजवापराच्या देयकांचा समावेश करण्यात आला होता. यामुळे देयकाची रक्कम जास्त आल्याने ग्राहकांमधून संताप व्यक्त केला. त्याचबरोबर वीज वापरापेक्षा देयकांमध्ये जास्त रक्कम आकारण्यात आल्याच्या तक्रारीही पुढे आल्या होत्या.

वाढीव वीज देयकांमुळे ग्राहकांचा रोष वाढू लागल्यानंतर राज्याच्या उर्जा विभागाने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी काही सवलतीची घोषणा केली. त्यात एकसमान तीन हप्त्यामध्ये वीज भरावी आणि एकत्रित वीज देयक भरल्यास त्यावर दोन टक्के सवलत मिळेल, अशा घोषणांचा समावेश होता. प्रत्यक्षात मात्र ही सवलत मिळत नसल्याचा आरोप ठाण्यातील वृंदावन भागातील ज्येष्ठ नागरिक जानकी शिवलकर आणि कुंदा जोशी यांनी केला आहे. एकत्रित देयकांचा भरणा करताना दोन टक्के सवलतीबाबत वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली होती. त्यावेळेस त्यांनी पुढच्या देयकामध्ये ही सवलत देण्यात येणार असल्याचे सांगितले होते. परंतु पुढच्या देयकांमध्ये ही सवलत दिसून आली नाही. त्यामुळे वीज कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना पुन्हा सवलतीबाबत विचारणा केली असता एकत्रित देयकांच्या रकमेमध्येच ही सवलत देण्यात आली होती, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

वीज देयकांवर दोन टक्के सवलत दिली जात आहे. मात्र, अशा प्रकारची सवलत दिली जात नसल्याच्या कोणत्याही तक्रारी आमच्याकडे प्राप्त झालेल्या नाहीत. तसेच याबाबत ग्राहकांच्या काही तक्रारी असतील तर त्यांनी वीज वितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तक्रारीचे निवारण करून घ्यावे.

– ममता पाण्डेय, जनसंपर्क अधिकारी, महावितरण, भांडुप परिमंडळ