प्रवीण दुधे, विश्वस्त, गणेश मंदिर देवस्थान
डोंबिवली चारही बाजूने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार उपलब्ध नसलेल्या सोयीसुविधांमुळे रहिवासी बेजार होऊ लागले आहेत. नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर झाल्यावर नागरी, विकासाच्या सोयीसुविधा उपलब्ध होतील, हे आजमितीस स्वप्नवतच राहिले. २७ गावे सुरुवातीला पालिकेत होती. या गावांवर विकासनिधी खर्च झाला. नंतर संघर्ष समिती, राजकीय वळणांमुळे ही गावे पुन्हा पालिकेतून बाहेर पडली. आता राजकीय हव्यासपोटी ही गावे पुन्हा पालिकेत समाविष्ट झाली आहेत. एकही उत्तम राजकीय सर्वसामान्य नेतृत्व दुर्दैवाने आम्हाला मिळाले नाही. अथवा उपलब्ध पर्यायांमध्ये त्यांच्या गुणांचा वापर विकासासाठी झाला नाही. केंद्रात किंवा राज्यात बहुतांशी वर्षे काँग्रेस अथवा आघाडी सरकारच्या राजवटीमुळे कल्याण-डोंबिवली शहराचा विकास घडवून आणता येत नाही, असे कायमस्वरूपी प्रतिपादन पालिकेतील युतीच्या सत्ताधाऱ्यांनी केले. युतीच्या काळात संपूर्ण मुंबई शहरात अनेक उड्डाणपुलांचे नियोजन करताना, डोंबिवली-कल्याण शहराचा विसर पडावा, ही एक खंत मनात निश्चित आहे. डोंबिवली पूर्व-पश्चिम वाहतूक पर्यायी व्यवस्था, बेशिस्त वाहनचालक, अनधिकृत रिक्षा थांबे, मध्यवर्ती रिक्षातळ आणि त्याचे योग्य नियमन सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत झाले पाहिजे. एकेरी वाहतूक तसेच सिग्नल यंत्रणा अमलात आली पाहिजे. पालिकेकडील राखीव भूखंड विकसित करून बीओटी तत्त्वावर शहरातील संस्थांना देऊन नवीन उपक्रम राबविण्यात यावेत.
डोंबिवली व ठाणे समांतर रस्त्याचा प्रश्न अनेक वर्षे रखडला आहे. नागरिकांचे आरोग्य, सुरक्षित जीवन, प्रदूषणमुक्त परिसर यांवर ठोस कार्यवाही होत नसल्याने न्यायालयाने दिलेली नवीन बांधकामांची स्थगिती म्हणजे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे अपयश आहे. अधिकारी आणि लोकप्रतिनिधींबरोबर अभ्यासू पण राजकीय इच्छाशक्ती नसलेल्या मंडळींनी एकत्रित येऊन एक प्रकारचा दबावगट निर्माण करणे व उत्तम प्रतीची कामे पारदर्शकतेसह घडवून आणणे आवश्यक वाटते.