दोन कुटुंबियांना सव्वा तीन कोटींची भरपाई; वादी-प्रतिवादींमध्ये तडजोडीची मात्रा कामी

‘राष्ट्रीय लोक अदालत’च्या माध्यमातून कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात घेण्यात आलेल्या अदालतमध्ये दोन वेगवेगळ्या अपघातांच्या घटनांमधील मृतांच्या नातेवाईकांना एकूण ३ कोटी २१ लाख ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा निर्णय न्यायालयाने दिला. वर्षांनुवर्षे न्यायालयात फेऱ्या मारून प्रकरणे लढविण्यापेक्षा तक्रारदार आणि प्रतिवादी यांनी लोक अदालतमध्ये समोरासमोर येऊन, न्यायालयाच्या साक्षीने तडजोड करून ही प्रकरणे मिटवली.

विपुल मेहता (५१) हे साखरेचे व्यापारी होते. त्यांची शहापूरजवळ कंपनी आहे. व्यवसायानिमित्त या भागात त्यांची नियमित ये-जा होती. ८ डिसेंबर २०१० रोजी शहापूरजवळील (नाशिक महामार्ग) खर्डी गावाजवळ त्यांना एका ट्रकचालकाने उडविले. पोलीस तक्रार होऊन न्यायालयात दावा दाखल झाला होता. या अपघातप्रकरणी विपुल यांच्या पत्नी आरती व मुलगी सिना यांनी न्यायालयात ९ कोटी रुपये नुकसानभरपाईचा दावा केला होता. त्रिशूळ ट्रान्सपोर्ट कंपनी, एचडीएफसी, कागरे जनरल इन्शुरन्स कंपनी यांना या प्रकरणात प्रतिवादी करण्यात आले होते.

पती विपुल यांचे व्यापार उलाढालीतील एकूण वार्षिक उत्पन्न ९६ लाख ९१ हजार ९०६ रुपये होते, असा दावा पत्नी आरती यांनी केला होता. गेली पाच वर्षे न्यायालयात हे प्रकरण सुरू होते. कल्याण न्यायालयातील राष्ट्रीय लोक अदालातमध्ये आरती व सिना मेहता यांचे नुकसानभरपाईचे प्रकरण सुनावणीसाठी घेण्यात आले. न्यायालयाने तक्रारदार आणि प्रतिवादी यांना सामंजस्याने हे प्रकरण मिटविण्यास सांगितले. न्यायालयाच्या पुढाकाराने दोन्ही पक्षकारांनी २ कोटी ४० लाख रुपयांच्या नुकसानभरपाईच्या दाव्यावर संमती दाखविली.

दोन कोटींचा दावा निकाली

कल्याणमधील एका अपघात प्रकरणात, लोक अदालतमध्येच न्यायालयाने मृतांच्या नातेवाईकांना ८१ लाख ५० हजार रुपये देण्याचा निर्णय दिला. जितेंद्रकुमार मिश्रा (३१) हे भांडुप येथील एका औषध कंपनीत व्यवस्थापक पदावर काम करीत होते. त्यांचे वार्षिक उत्पन्न ९ लाख रुपये होते. गेल्या वर्षी मे महिन्यात पत्रीपुलाजवळून स्वत:च्या गाडीने जात असताना, त्यांना एका वाहनाने जोराची धडक दिली. त्यात जितेंद्रकुमार यांचा मृत्यू झाला.  जितेंद्रकुमार यांची पत्नी वंदनाकुमारी व मुलगी अनिता यांनी जितेंद्रकुमार यांच्या मृत्यूप्रकरणी प्रतिवादी वाहन मालकाविरुद्ध २ कोटींचा नुकसानभरपाईचा दावा दाखल केला होता. चोलामंडल कंपनी, जनरल इन्शुरन्स कंपनी यांना या प्रकरणात प्रतिवादी करण्यात आले होते.  लोक अदालतमध्ये तडजोड करण्याचा सल्ला देण्यात आला होता.

लोक अदालतमधील मार्गदर्शक

ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एस. के. कोतवाल, मोटार अपघात दावा प्राधिकरणाचे सदस्य के. डी. वडणे, कोचेवाड यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली लोक अदालतचा कार्यक्रम पार पाडला. तक्रारदार आणि प्रतिवादींनी लोक अदालतमध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेऊन प्रकरणे निकाली लावण्यासाठी पुढाकार घेतला, हे कौतुकास्पद आहे, असे सदस्य कोचेवाड, सचिव आर. एस. साळगावकर यांनी सांगितले.