राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात भिवंडी न्यायालयात मानहानीचा खटला दाखल असून, या प्रकरणात न्यायालयाने बुधवारी राहुल गांधी यांचा जामीन अर्ज मंजूर केला. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या हमीवर राहुल यांना जामीन देण्यात आला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या ३० जानेवारीला होणार असून त्यासाठीही राहुल यांना पुन्हा न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.

दोन वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी राहुल गांधी हे भिवंडीत आले होते. या सभेत त्यांनी राष्ट्रीय संघाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. महात्मा गांधी यांच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांचा हात होता, असा सनसनाटी आरोप त्यांनी केला होता.

याप्रकरणी राजेश कुंटे यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. हा दावा फेटाळून लावण्यासाठी राहुल यांनी उच्च न्यायलयात याचिका दाखल केली होती, मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावली. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, मानहानीचा खटला लढविण्यास तयार असल्याचे सांगत राहुल यांनी सर्वोच्च न्यायालयातील याचिका मागे घेतली. त्यामुळे भिवंडी न्यायालयात हा खटला उभा राहिला असून त्यांची सुनावणी बुधवारी होती. त्यासाठी राहुल यांनी भिवंडी न्यायालयात हजेरी लावली. न्यायधीश तुषार वाजे यांच्या न्यायालयात ही सुनावणी होती. या सुनावणीदरम्यान राहुल यांनी न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला. न्यायाधीश वाजे यांनी त्यांचा जामीन अर्ज मंजूर करत १५ हजारांच्या वैयक्तिक जातमचुलक्यावर त्यांची सुटका केली.

गांधींच्या विचारांसाठी लढतोय – राहुल गांधी

महात्मा गांधींच्या विचारांसाठी लढतोय, याचा मला अभिमान आहे. गांधींच्या विचारधारेने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले आणि देशाला स्वत:च्या पायावर उभे राहायला शिकविले. त्याच विचारधारेवर काँग्रेस पक्षाची वाटचाल सुरू आहे. एकीकडे स्वतंत्र्याची विचारधारा आहे, तर दुसरीकडे गुलामीची विचारधारा आहे. या गुलामीच्या विचारधारेविरोधात लढत असून ही विचारधारा देशाला झुकवू पाहात आहे, पण मी कदापि तसे होऊ देणार नाही, असे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भिवंडीत कार्यकर्त्यांशी बोलताना केले. तुम्ही रांगेत उभे आहात, पण तुमचा सगळा पैसा काही मोठय़ा उद्योगपतींकडे जाणार आहे, असा आरोपही त्यांनी ‘चलनकल्लोळ’च्या पाश्र्वभूमीवर केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ १५ जणांचे सरकार चालवीत असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.

न्यायालयातील सुनावणीदरम्यान राहुल गांधी यांच्यापुढे एक प्रस्ताव ठेवण्यात आला होता. संघाविषयी केलेल्या वक्तव्याबाबत चूक मान्य करण्यास तयार असतील, तसेच भविष्यात अशा प्रकारचे वक्तव्य करणार नसतील तर न्यायालयातील अर्ज मागे घेऊ, अशा स्वरूपाचा हा प्रस्ताव होता. मात्र त्याविषयी राहुल यांच्याकडून कोणतीच प्रतिक्रिया आली नाही, त्यामुळे अर्ज मागे घेण्यात आला नाही.   – राजेश कुंटे, याचिकाकर्ते

मानहानीचा खटला जामीनपात्र असल्यामुळे बुधवारी न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला. १५ हजारांच्या वैयक्तिक जातमचुलक्यावर न्यायालयाने हा जामीन अर्ज मंजूर केला आहे. या प्रकरणातील सत्य समोर यावे म्हणून हा खटला आम्ही लढवीत आहोत. या खटल्याची पुढील सुनावणी ३० जानेवारीला होणार आहे.    – अ‍ॅड. नारायण अय्यर, राहुल यांचे वकील