News Flash

शांतता, उद्घोषणा बंद आहे!

गेल्या पाच दिवसांपासून शहाड रेल्वे स्थानकात रात्री उद्घोषणा देण्यासाठी कर्मचारी उपलब्ध नाहीत.

स्थानकातील इंडिकेटरही बंद अवस्थेत आहेत.

 

शहाड रेल्वे स्थानकात रात्रीच्या वेळी प्रवासी संभ्रमात

पाच दिवसांपासून शहाड रेल्वे स्थानकात उद्घोषणा बंद असल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला आहे. रात्री ८ ते सकाळी ८ असे १२ तास येथे कोणत्याही प्रकारची उद्घोषणा होत नसल्याने त्याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. तसेच संपूर्ण रेल्वे स्थानकातील इंडिकेटरही बंद अवस्थेत असल्याने गाडय़ांच्या वेळाही चुकत असल्याचे प्रवाशांनी सांगितले.

गेल्या पाच दिवसांपासून शहाड रेल्वे स्थानकात रात्री उद्घोषणा देण्यासाठी कर्मचारी उपलब्ध नाहीत. त्यामुळे या काळात प्रवाशांना कोणत्याही प्रकारच्या सूचना ऐकविल्या जात नाहीत. त्यामुळे त्यांचा गोंधळ उडाला आहे. त्यात सोमवारी रात्री तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांचे खूप हाल झाले. शहाड स्थानकातील या मौन व्रताविषयी प्रवाशांनी स्टेशन मास्तरांकडे विचारणा केली. मात्र त्यांना समाधानकारक उत्तरे मिळू शकली नाहीत.

गेल्या तीन महिन्यांपासून रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यात आता रात्री आठनंतर उद्घोषणा होत नसल्याने रात्रीच्या वेळी मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गाडी गेली की नाही, याची माहिती मिळत नाही. तसेच पायाभूत सुविधांचीही येथे वानवा आहे. येथील पाणपोईचे नळच गायब आहेत. या संदर्भात रेल्वेच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, नळ लावले की गर्दुले काढून नेतात, असे उत्तर मिळते. पाणी नाही, इंडिकेटर नाही, उद्घोषणा नाहीत, मग प्रवाशांनी करायचे काय, असा प्रश्न कल्याण-कसारा रेल्वे पॅसेंजर वेल्फेअर असोसिएशनचे सचिव नीलेश देशमुख यांनी विचारला आहे.

स्थानकावरील ‘इंडिकेटर’ नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. याबाबत चौकशी करण्यात येईल आणि संबंधित विभागाला कळविण्यात येईल.

ए. के. सिंह, जनसंपर्क अधिकारी मध्य रेल्वे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2017 1:37 am

Web Title: railway announcement shahad railway station
Next Stories
1 खोपट आगारात अस्वस्थ एसटी कर्मचाऱ्यांचा ठिय्या
2 बारवी धरणग्रस्तांच्या जमीन मूल्यांकनात घोळ
3 पारदर्शकतेची ऐशीतैशी
Just Now!
X