अनेक भागांत पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम

वसई : मंगळवारी रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने बुधवारी दिवसभर वसई-विरार शहराला धुऊन काढले. यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला. वसई तथा अर्नाळ्याच्या किनारी भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने किनाऱ्यावरील पर्यटकांच्या वर्दळीला काहीशी ओहोटी लागल्याचे आढळून आले.

मागील आठवडय़ातील तुफानी वृष्टीनंतर गेले चार दिवस पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र, मंगळवारी रात्री वादळीोर्?यांसह वाऱ्यासह पुन्हा पावसाने हजेरी लावली. बुधवारी दिवसभर कधी संततधार तर कधी मुसळधार अशा स्वरूपात पावसाने शहराला अक्षरश: धुवून काढले. यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले. काही रस्ते जलमय झाल्याने वाहतुकीचा वेगही मंदावला.

वसईतील दिवाणमान, डीजी नगर परिसर जलमय झाला होता. नालासोपाऱ्यात सेन्ट्रल पार्क, विजय नगर, आचोळे, निलेगाव, पाटणकर पार्क आदी सखल परिसरातही पाणी साचल्याचे दिसले. वसईतील देवतलाव भागातील रास्ता पूर्णत: पाण्याखाली गेला होता. अनेक गृहसंकुलांच्या आवारात पाणी साचल्याने रहिवाशांना पाण्यातूनच मार्गक्रमण करावे लागले.

मुसळधार पावसाबरोबरच विजेचा लपंडावही सुरू होता. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह ‘वर्क फ्रॉम होम’ करणारेही मेटाकुटीस आले होते.

पावसात खड्डय़ांचे विघ्न

वसई-विरारमधील अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजविण्यात आले आहेत. मात्र, मुसळधार पावसामुळे हे खड्डे पुन्हा उघडे पडले. त्याचसोबत पालिकेचा ढिसाळ कारभार आणि ठेकेदाराचे कुचकामी कामही उघडकीस आले. या खड्डय़ांमध्ये बुधवारी पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांना रस्त्यावरून वाहने नेण्यास मोठय़ा प्रमाणावर अडथळा निर्माण होत होता, तर नालासोपारा पूर्वेला या खड्डय़ांमध्ये वाहनचालकांचा किरकोळ अपघात झाल्याच्या दोन घटना बुधवारी घडल्या आहेत. त्यामुळे हे खड्डे बुजवावेत, अशी मागणी या निमित्ताने वाहनचालकांनी केली आहे.

वादळी पावसामुळे किनारे ओस

वसई, अर्नाळा, रानगाव, कळंब याठिकाणच्या किनारी भागात वादळी वाऱ्यासह बुधवारी दिवसभर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे एरवी पर्यटकांनी गजबजणाऱ्या किनाऱ्यांवरील पर्यटकांची वर्दळ खूपच कमी झाल्याचे दिसून आले. अतिवृष्टीच्या पूर्वसूचनेमुळे मच्छीमारांच्या बोटीही किनाऱ्यावर नांगरल्याचे दृष्टीस पडले.

वसईतील पर्जन्यमान

(मिलिमीटरमध्ये)

* मांडवी              ६२

* आगाशी             ४०

* निर्मळ              ६७

* विरार               ४७

* माणिकपूर        ४३

* वसई                 ४२