वसईच्या शिधावाटप यंत्रणेला भ्रष्टाचाराची कीड

खुल्या बाजारात अन्नधान्याची वाढती महागाई आणि स्वयंपाकाच्या गॅसचे वाढते दर यामुळे रास्त दरातील धान्य व रॉकेल खरेदी करण्यासाठी जाणाऱ्या वसईतील सामान्यजनांना हात हलवत परतावे लागत आहे. वसई तालुक्यातील बहुतांश शिधावाटप दुकानांतील रॉकेल काळ्या बाजारात विकले जात असल्याचे समोर येत आहे. तर दुसरीकडे या दुकानांत येणारे धान्य दोन-तीन तासांत संपल्याचे जाहीर करून ते मागल्या दाराने किरकोळ दुकानदारांना पुरवले जात असल्याचेही दिसून आले आहे.
वसईत तालुक्यात ६३५ परवानाधारक रॉकेल विक्रेते असून १८२ रास्त भावाची दुकाने आहेत. सध्या शहरात दररोज ३२ रॉकेलचे टँकर येतात. एका टँकरमध्ये १२ हजार लिटर रॉकेल असते. १५ रुपये प्रति लिटर असा या रॉकेलचा सरकारी दर आहे. नियमानुसार दोन गॅस सिलिंडर असलेल्या कुटुंबाला रॉकेल देता येत नाही. तर एक सिलिंडर असलेल्या घरांना प्रत्येकी चार लिटर रॉकेलची मर्यादा आहे. मात्र, तहसीलदार कार्यालयाकडे तालुक्यातील गॅसधारकांची अद्ययावत माहितीच नाही. शिवाय गेल्या दहा वर्षांपासून रॉकेलचा जाहीरनामाही प्रसिद्ध न झाल्याने रॉकेलचा काळाबाजार सुरू आहे. मुळात किती रॉकेलची गरज आहे हे माहित नसताना एवढय़ा मोठय़ा प्रमाणात शासकीय दराने रॉकेल मागवून ते हडप केले जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
दुसरीकडे, धान्याचाही काळाबाजार सुरू आहे. नागरिकांना तीन प्रकारच्या शिधापत्रिका आहे. त्यानुसार प्रत्येकी २ किलो गहू आणि ३ किलो तांदूळ देण्यात येतो. शिधा वाटप दुकान महिनाभर खुले राहणे आवश्यक आहे; परंतु जेव्हा धान्य येते तेव्हा त्याची माहिती नागरिकांना मिळत नाही आणि अवघ्या दोन-तीन तासांत धान्य संपल्याचे जाहीर केले जाते. मात्र हे धान्य काळ्याबाजारात विकले जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. पुरवठा अधिकारी आणि दुकानदारांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप आहे. काही दुकानदारांकडे एकापेक्षा अधिक परवाने देण्यात आलेले आहे. एका दुकानदाराकडे तर १८ परवाने असल्याचे उघड झाले आहे.

कारवाई नाहीच
या बाबत अनेक तक्रारी शासनदरबारी करण्यात आल्या होत्या. कोकण विभागीय आयुक्तांनी या प्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले होते. मात्र अद्याप कारवाई झालेली नाही. या बाबत जिल्हा पुरवठा अधिकारी उमेश बिरारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अनेक तक्रारी येत असतात आणि त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई होत असल्याचे सांगितले. यापूर्वी दोन पुरवठा निरीक्षकांना भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून प्रांत अधिकाऱ्यांच्या आदेशाने निलंबित केल्याचे त्यांनी सांगितले. गैरव्यवाहर करणारे अनेक दुकांनावर कारवाई झाली असून छापे घालण्यात येतात तसेच काही अधिकाऱ्यांविरोधात विभागीय चौकशीचे आदेश देण्यात येतील असेही ते म्हणाले. शासकीय नियमानुसार पुरवठा होत असल्याचा दावा वसईचे तहसीलदार सुनील कोळी यांनी केला. कुठे गैरव्यवहार होत असतील तर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले. पुरवठा अधिकारी प्रदीप मुकणे यांच्याशी सातत्याने संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद देण्यास नकार दिला.

धान्यात सिमेंटचे खडे
एकीकडे धान्य मिळत नसताना जे थोडेफार धान्य मिळते तेसुद्धा निकृष्ट दर्जाचे असते. वसईच्या हाथीमोहल्ला भागात राहणाऱ्या एका रहिवाशाना शिधा वाटप दुकानातून घेतलेल्या तांदुळात सिमेंटची पावडर आणि खडे आढळून आले आहेत. याबाबत तहसीलदारांकडे तक्रार केल्यांनतर पंचनामा करून दुकानातील धान्य जप्त करण्यात आले आहे.