tv15धनंजय मस्के यांनी बी.ए. आणि बी. एड्चे शिक्षण पूर्ण करतानाच देशसेवेचे व्रत अंगीकारायचे ठरवले. त्यानुसार शिक्षकी पेशा सोडून ते २००८ साली गडचिरोलीत पोलीस दलात भरती झाले. मार्च २०११ ला शिवगटा या ठिकाणी नक्षल व पोलीस चकमकीमध्ये ५ किलो जिलेटिन, १ एस.एल.आर. व २० काडतुसे जप्त क रण्याच्या कामात पोलीस शिपाई त्यांचा मोलाचा वाटा होता. मस्के यांचा सी-६०मधील सहकारी पोलीस शिपाई शंकर पुंगाटीनेही बी.ए. पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर गडचिरोली दलात प्रवेश केला होता.
२०११ मध्ये ६ एप्रिलला नक्षल दलविरोधी अभियान राबवताना जोगनकट्ट भागात नक्षल दल फिरत असल्याची गोपनीय बातमी त्यांना मिळाली. बांडे नदी पार करीत रामा कुडुयामची पार्टी मध्यभागी, डावीकडे कोको नरोटेची पार्टी तर उजवीकडे मधुकर मट्टामीची पार्टी अशा फॉम्रेशनमध्ये पोलीस पथक जंगलातून मार्गक्रमण करीत होते. रामा कुडुयामच्या पार्टीत धनंजय मस्के हे आघाडीवर होते. शंकर पुंगाटीही त्याच पार्टीत होते. काही अंतर पार केल्यानंतर संशयास्पद हालचाली दिसल्यानंतर त्यांनी कमांडरला ही बातमी दिली. परंतु त्याचवेळी ८० ते १०० नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल मस्केंनीही गोळीबार सुरू केला. या चकमकीत गोळी लागून ते जखमी झाले.
आपल्या इतर पोलीस सहकाऱ्यांचे मनोधैर्य खचू नये म्हणून जखमी अवस्थतेही मस्केंनी संभाषण सुरू ठेवले होते. धनंजयला वाचवण्याकरिता शंकर पुंगाटी यांनीही आपल्या जिवाची पर्वा न करता कव्हर फायर देत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान समोरून आलेली एक गोळी शंकरच्या डाव्या पायामध्ये घुसली. दोघांनीही आपली लढाई सुरूच ठेवली. त्यानंतर इतर दोन पार्टीची त्यांना मदत मिळाली आणि नक्षल अ‍ॅम्बुश उद्ध्वस्त झाला. मृत्यू समोर दिसत असतानाही प्राणपणाने आणि धैर्याने नक्षली मुकाबला करणाऱ्या शूरवीर धनंजय मस्केने जंगलातच प्राण सोडले. जखमी शंकर पुंगाटींना पोलीस पथकाने गडचिरोलीतील रुग्णालयात तातडीने हलवल्याने त्यांचे प्राण वाचले.
 धनंजयला वाचवण्याकरिता शौर्याने पुढे आलेल्या शंकर पुंगाटी यांना राष्ट्रपती शौर्यपदक दिले जाणार आहे. तर धनंजय मस्के यांना मरणोत्तर शौर्यपदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. पंढरी शालिकराम मस्के (शहीद धनंजय मस्के यांचे वडील) पाणावलेले डोळे आणि मुलाबद्दलचा अभिमान अशा संमिश्र भावनेने हे शौर्यपदक स्वीकारतील. आज महाराष्ट्र पोलीस दलातील शूर वीरांची ही गाथा तुमच्यासमोर मांडताना या शेवटच्या भागात कवी प्रदीप यांच्या ‘ऐ मेरे वतन के लोगों’ या ओळी डोळय़ांसमोर तरळत आहेत.
डॉ. रश्मी करंदीकर, – पोलीस उपायुक्त, ठाणे शहर (वाहतूक शाखा)