बोर्डीतील चिकू उत्पादकांची सरकारकडे मागणी; खराब हवामानामुळे नुकसान झाल्याचा दावा

राष्ट्रीय पीकविमा कार्यक्रमांतर्गत हवामानावर आधारित काजू, आंबा, केळीच्या पिकांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला, पण या योजनेत पालघर जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक असलेल्या चिकू फळाला डावलण्यात आले. चिकूचा समावेश या योजनेत करणे गरजेचे आहे, अशी मागणी बोर्डी येथील चिकू उत्पादकांनी केली. पाऊस, तापमान, सापेक्ष आद्र्रता, वेगवान वारे आणि गारपिटीमुळे चिकू पिकाचे नुकसान होत नाही का, असा संतप्त सवाल चिकू बागायतदारांनी केला आहे.

पालघर जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात चिकूचे उत्पादन घेतले जाते. सुमारे ३५ हजार हेक्टरवर चिकू लागवड होत असल्याचे सरकारी आकडेवारीतून स्पष्ट होते. मागील काही वर्षांपासून वातावरण बदलामुळे चिकू बागायतदारांवर मोठे संकट कोसळले आहे. वादळी वारे, अनियमित पाऊस यामुळे उत्पादनातही चढ-उतार होण्याचे प्रमाण वाढले आहे. मे-जून महिन्यात अचानक तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला, तसेच अनियमित पावसाने फळधारणेवर परिणाम झाल्याने ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात मिळणाऱ्या या हंगामावर मोठा परिणाम झाला आहे. त्यातच यंदा थंडीची लाटही उशिरा आल्याने पुढील हंगामावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. वास्तविक चिकू पीक वर्षभर फळ देणारे आहे. मात्र पर्यावरण संतुलन बिघडल्याने पिकावर मोठय़ा प्रमाणात दुष्परिणाम होत आहे. त्यामुळे चिकूला राष्ट्रीय पीकविमा कार्यक्रमात वर्षभर विमा संरक्षण देण्याची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी बागायतदार करीत आहेत.