शाळेत असताना बहुतेकांसाठी शालेय अभ्यासक्रमातील कठीण विषयांत इंग्रजी, गणितासह विज्ञान या विषयाचाही समावेश असतो. एकदा का या विषयांची गोडी लागली की ते विषय ‘अवघड सोपे झाले हो’ असे होऊन जातात. मात्र पहिल्यापासूनच त्या विषयांची नावड निर्माण झाली तर हे विषय म्हणजे डोकेदुखी होऊन बसते. गणितातील प्रमेय, आकडेमोड, विज्ञानातील प्रयोग, नियम, सिद्धांत हे सगळेच अवघड जाते. पण लहान वयातच किंवा शालेय स्तरावरच जर विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविला, त्यांना हसत-खेळत आणि गंमतीशीर प्रकारे, सोप्या व कोणालाही सहज करता येतील, अशा प्रयोगांतून विज्ञान शिकविले, समजावून सांगितले तर नक्कीच फरक पडतो. हे केवळ कल्पनाचित्र नाही तर अंबरनाथ येथील निवृत्त प्राध्यापक बी. डी. तथा भगवान चक्रदेव यांनी ते प्रत्यक्षात करून दाखविले आहे. एका अर्थाने विद्यार्थी, पालक आणि समाजात विज्ञान लोकप्रिय करणारे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणारे ते ‘विज्ञानमित्र’ आहेत.
६४ वर्षीय चक्रदेव यांचे मूळ गाव रायगड जिल्ह्य़ातील व कर्जतजवळील ओहिळ. त्यांचे वडील दत्तात्रय हे रेल्वेत लिपिक होते. ते घरी विद्यार्थ्यांसाठी शिकवणीवर्ग घेत असत. मोठे भाऊ नारायण हे शिक्षक होते. लहानपणापासून घरातील या शैक्षणिक वातावरणाचा त्यांच्यावर कळत-नकळत परिणाम झाला. भगवान चक्रदेव यांचे बालपण, तरुणपण कल्याण येथे गेले. सुभेदारवाडा ही त्यांची शाळा. दहावीनंतर रुपारेल महाविद्यालयातून त्यांनी ‘बीएस्सी’पदवी मिळविली. त्यानंतर उल्हासनगर येथील ‘सेवासदन’येथून ‘डीएड’केले. कर्जत, कल्याण येथे शाळेत शिक्षक म्हणूनही काही काळ नोकरी केली. पुढे उल्हासनगर येथील ‘सीएचएम’ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी केली. ३३ वर्षांच्या सेवेनंतर ते महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाले.
मोठा भाऊ नारायण यांच्याकडून त्यांना विज्ञानविषयाची प्रेरणा मिळाली, आवड निर्माण झाली. ते स्वत: विद्यार्थी असताना किंवा शाळेत/महाविद्यालयात शिक्षक-प्राध्यापक म्हणून नोकरी करत असताना त्यांना एक गोष्ट प्रकर्षांने जाणवली, ती म्हणजे आपल्या समाजात असलेला वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव. आपल्याकडे शाळेत किंवा महाविद्यालयात शिकविले जाणारे विज्ञान हे केवळ आणि केवळ पुस्तकी आहे. परीक्षा व घोकंपट्टी याच्यापुरतेच ते मर्यादित आहे. विद्यार्थ्यांना त्याचे प्रात्यक्षिक ज्ञान फारसे मिळतच नाही. त्यामुळे चक्रदेव सरांनी पुस्तकात बंदिस्त असलेल्या विज्ञानाला त्यातून बाहेर काढण्याचे ठरविले. हसत-खेळत विज्ञानाचा प्रसार करायचा याचा ध्यास त्यांनी घेतला. महाविद्यालयात असतानाही नोकरी सांभाळून आणि वरिष्ठांच्या सहकार्यामुळे ते विज्ञान प्रसारासाठी काम करतच होते. निवृत्त झाल्यानंतर या कामाला अधिक गती व चालना मिळाली.
मराठी विज्ञान परिषदेच्या अंबरनाथ शाखेचे अध्यक्ष म्हणूनही ते काम करत आहेत. बार्शी येथे २००१ मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी विज्ञान संमेलनात त्यांना ‘आदर्श विज्ञान प्रसारक’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. २०००मध्ये ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारिकर यांच्या हस्ते त्यांना उत्कृष्ट विज्ञान साहित्याच्या निर्मितीबद्दल हरिभाऊ मोटे पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाचा प्रसार व्हावा, त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा, विज्ञान हा विषय त्यांना रूक्ष न वाटता त्यात त्यांना आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांनी स्वत: काही कार्यक्रम तयार केले आहेत. अंबरनाथ येथील घरी त्यांनी कार्यशाळा व प्रयोगशाळाही उभारली आहे. कार्यक्रमात सादर करत असलेल्या विज्ञान प्रयोग कार्यक्रमातील सर्व उपकरणे, साहित्य चक्रदेव हे स्वत: घरीच तयार करतात. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीनही भाषांमधून त्यांनी आजवर दीड हजारांहून अधिक कार्यक्रम मुंबई, ठाणेसह संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात सादर केले आहेत. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, सहकारी गृहनिर्माण संस्था, विविध सामाजिक, शैक्षणिक, स्वयंसेवी संस्थांमधून ते ‘फन विथ मॅजिक’, ‘विज्ञानातील मनोरंजक प्रयोग’, ‘जॉय ऑफ लर्निग’, ‘हसत खेळत विज्ञान’, ‘फॅसिनेटिंग एक्स्प्रिमेंट इन फिजिक्स’ या नावाने कार्यक्रम सादर करत असतात. विज्ञानातील विशेषत: भौतिकशास्त्र हा विषय ते साध्या-सोप्या व मनोरंजक पद्धतीने काही आगळ्या प्रयोगांतून सहजपणे उलगडून दाखवितात.
त्यांचा हा कार्यक्रम दोन ते अडीच तासांचा असतो. आबालवृद्धांपर्यंत सर्व जण त्यात सहभागी होऊ शकतात. प्रयोग करून झाल्यानंतर ते त्यामागील कार्यकारणभाव, विज्ञान, त्याचे नियम सोप्या भाषेत समजावून सांगतात. वनवासी भागातील किंवा अती दुर्गम भागातील शाळा, आश्रमशाळा, लहान खेडय़ातील शाळा, अंध व मुकबधिर मुलांच्या शाळांमधून चक्रदेव कोणतेही मानधन न घेता विनाशुल्क प्रयोग करतात. ‘न्यूटनचा झोपाळा’ (संवेगाचा अक्षयतेचा नियम), ‘विद्युत प्रभार’, ‘चुंबक’, ‘बनॉर्ली’ (हवेच्या झोतावरील प्रयोग), ‘धन आणि ऋण भार’, ‘आकर्षण व प्रतिकर्षण’ हे व अन्य असे सुमारे ५० प्रयोग त्यांच्याकडे तयार आहेत.
चक्रदेव सरांचे आणखी एक महत्त्वाचे योगदान म्हणजे गेली २१ वर्षे ते अंबरनाथ येथे ‘सायन्स क्लब’ चालवीत आहेत. दर रविवारी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत भगिनी मंडळ शाळा, साईविभाग, अंबरनाथ (पूर्व) येथे हा क्लब भरतो. येथे उपस्थित राहण्यासाठी वयाची किंवा शिक्षणाची अट नाही. त्यासाठी कोणतेही शुल्कही आकारले जात नाही. रुईया महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉ. मनीषा कर्पे, खासगी शिकवणी वर्ग घेणाऱ्या सुधा सोमणी, प्रमोद अष्टपुत्रे यांचे सहकार्य या कामी त्यांना मिळते. विज्ञान क्षेत्रातील मोहन आपटे, अ. पां. देशपांडे, जयंत जोशी, दिलीप हेर्लेकर, अभय यावलकर अशी तज्ज्ञ मंडळी येथे व्याख्यान देण्यासाठी येऊन गेली आहेत.
मुलांमध्ये लहान वयातच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षक आणि पालक यांचा महत्त्वाचा सहभाग असणे अत्यंत गरजेचे आहे. पालकांनी आपल्या पाल्यात विज्ञान विषयाची आवड निर्माण करण्यासाठी विज्ञानविषयक पुस्तके, प्रयोगाचे साहित्य त्यांना भेट दिले पाहिजे. विज्ञानाच्या शिक्षकांचीही मोठी जबाबदारी आहे. शाळेत विज्ञानविषयक उपकरणे, साहित्य विद्यार्थ्यांना पाहायला व हाताळायला मिळाले पाहिजे. ते कपाटातून बंदिस्त ठेवू नये. मुलांना शाळेत तांत्रिक ज्ञानही मिळाले पाहिजे. प्रत्येक शाळेत कार्यशाळा (वर्कशॉप) असावे. तेथील हत्यारे, उपकरणे वापरून त्यांना प्रयोग करू दिले पाहिजेत. पण आपल्याकडे अपवाद वगळता अनेक शाळांमधून ते नाही, अशी खंत चक्रदेव व्यक्त करतात.
विज्ञानप्रसाराच्या या कामात चक्रदेव सरांना त्यांचा मुलगा अमोल, सून आणि पत्नी शोभा यांचा नैतिक पाठिंबा नेहमीच मिळतो. बंगळूरु येथे विज्ञानविषयक प्रयोग, साहित्य व उपकरणांचे विश्वेवरय्या हे भव्य संग्रहालय आहे. तेवढे भव्य उभारता आले नाही तरी लहान प्रमाणात असे केंद्र प्रत्येक जिल्हा व तालुको पातळीवर उभारले जावे, असे चक्रदेव यांना वाटते.
shekhar.joshi@expressindia.com