वांगणीत एका वयोवृद्धाची राहत्या घरात हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रभाग क्रमांक ४ मध्ये पितांबर प्रेमचंद भाटिया (८०) या ज्येष्ठ नागरिकाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला असावा असा स्थानिकांचा अंदाज आहे.
भाटिया यांना मूलबाळ नसून काही वर्षांपूर्वीच त्यांच्या पत्नीचे निधन झाले. तेव्हापासून ते आपल्या बंगल्यात एकटेच राहत होते. यापूर्वी दोन-तीनदा त्यांच्या घरात चोरीचा प्रयत्नही झाला होता. आठ दिवसांपूर्वी त्यांच्या घराच्या काचा फोडण्याचा प्रयत्न काही अज्ञात चोरटय़ांनी केला. त्याबद्दल त्यांनी पोलिसांत तक्रारही केली होती. त्यानंतर सकाळच्या सुमारास त्यांच्या घरात घरकाम करणारी महिला आली असता तिला भाटिया बंगल्याच्या दारात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले. तिने आरडाओरड करून शेजारच्या लोकांना कळवल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला.
दरम्यान, पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून तपास सुरू केला आहे. प्रथमदर्शनी मृत भाटिया यांच्या घरात चोरीच्या कोणत्याही खुणा आढळून आल्या नाहीत. त्यामुळे हा खून चोरीच्या उद्देशाने झाला की आणखी कोणत्या कारणाने याबाबत खुलासा होऊ शकलेला नाही. मात्र या घटनेने संपूर्ण वांगणी शहर हादरून गेले आहे. गेल्या काही दिवसांत वांगणीत सातत्याने गुन्हेगारी घटना घडत आहे. चोरी-मारामारी यासोबत अन्य शहरात घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमध्ये वांगणीतील आरोपी सापडून आल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींसह राजकारण्यांनी यासाठी एकत्रित आवाज उठवण्याची गरज नागरिकांमधून व्यक्त होत आहे.