महाराष्ट्रासह देशाच्या अन्य प्रांतांत आयुर्वेद प्रचार, प्रसाराचे काम करणाऱ्या ‘आयुर्वेद व्यासपीठ’ संस्थेतर्फे ‘राष्ट्रीय आरोग्य दिना’चे (धन्वंतरी जयंती) औचित्य साधून राज्यभर आठ दिवसांत ‘आहाराकडून आरोग्याकडे’ या विषयावर ४०० व्याख्यानांचे आयोजन केले आहे. तज्ज्ञ वैद्य मंडळी ही व्याख्याने देणार आहेत. या पाश्र्वभूमीवर बदलती जीवनशैली, त्यामुळे वाढणारे आजार, व्याधी, भारतीय आहारशास्त्राकडे होत असलेले दुर्लक्ष. शालेय शिक्षणात आयुर्वेदाचा समावेश या विषयावर ‘आयुर्वेद व्यासपीठ’चे संस्थापक अध्यक्ष व डोंबिवलीतील ज्येष्ठ वैद्य विनय वेलणकर यांच्याशी साधलेला संवाद..

विनय वेलणकर ज्येष्ठ वैद्य व संस्थापक अध्यक्ष, आयुर्वेद व्यासपीठ, डोंबिवली

Senior Gandhian Dhirubhai Mehta passed away
ज्येष्ठ गांधीवादी धीरूभाई मेहता यांचे निधन; कस्तुरबा हेल्थ सोसायटी झाली पोरकी
sanjay ruat and shrikant shinde
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये गैरव्यवहार? संजय राऊतांची थेट मोदींकडे तक्रार; म्हणाले, “बिदागीच्या रकमा…”
central government, appoints manoj panda
वित्त आयोगाच्या सदस्यपदी अर्थतज्ज्ञ मनोज पांडा, डॉ. निरंजन राजाध्यक्ष यांच्या जागी निवड
kolhapur, cracks on ambabai mahalaxmi idol
अंबाबाई – महालक्ष्मी मूर्तीवर तडे, तातडीने संवर्धन गरजेचे; पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या पाहणी अहवालात निष्कर्ष

* ‘आयुर्वेद व्यासपीठ’चे मुख्य उद्दिष्ट काय आहे?

– महाराष्ट्रातील वैद्य मंडळींना संघटित करून आयुर्वेदाचा प्रचार, प्रसार, सेवा, संघटन आणि शिक्षण या पंचसूत्री माध्यमातून करणे हे आयुर्वेद व्यासपीठाचे मुख्य उद्दिष्ट आहे. राज्यातील तीस जिल्ह्य़ांमध्ये गेल्या सतरा वर्षांपासून व्यासपीठाचे काम सुरू आहे. शिवाय गुजरात, राजस्थानच्या काही भागांत संस्थेचे काम सुरू आहे. कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेशसह दक्षिणेतील काही राज्यांत आयुर्वेद प्रचाराचे काम हाती घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या माध्यमातून सुमारे आठ हजार आयुर्वेदाच्या माध्यमातून वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या वैद्यांचे संघटन तयार झाले आहे.

* या व्यासपीठातर्फे कोणते उपक्रम राबविले जातात?

– आयुर्वेदाच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार करताना विविध भागांत वैद्य कोणत्या उपचार पद्धती अवलंबतात. या माहितीचे आदानप्रदान करण्यासाठी दर महिन्याला वैद्य मंडळींची एकत्रित बैठक होते. त्यात आयुर्वेदीय उपचार, तसेच रुग्णसेवेबाबत चर्चा होते. आहार जसा देह घडवितो तसा तो बिघडवतोही. आहार संकल्पनेच्या जागृतीसाठी अनेक ठिकाणी व्याख्याने आयोजित केली जातात. वनौषधींचे प्रदर्शन, त्यांचे संकलन याचे उपक्रम आयोजित केले जातात. आयुर्वेदातील विशेष तज्ज्ञांची मार्गदर्शन शिबिरे आयोजित केली जातात. आयुर्वेद महाविद्यालयातून बाहेर पडणाऱ्या नवोदित वैद्यांचा सन्मान केला जातो. महिला वैद्यांची स्वतंत्र आयुर्वेद शिबिरे आयोजित केली जातात. सात पूर्णवेळ प्रचारक गेली अनेक वर्षे आयुर्वेदाच्या प्रचारासाठी कार्यरत होते.

* ‘राष्ट्रीय आरोग्य दिना’निमित्त कोणते कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत?

दिवाळी सणात येणारा ‘धन्वंतरी दिन’ (जयंती) हा ‘राष्ट्रीय आरोग्य दिन’ म्हणून साजरा करावा, ही व्यासपीठाची अनेक वर्षांपासूनची शासनाकडे मागणी होती. गेल्या महिन्यात केंद्रीय मंत्र्यांनी ‘धन्वंतरी दिन’ (डॉक्टरांचा देव) ‘राष्ट्रीय आरोग्य दिन’ म्हणून जाहीर केला आहे. या दिनाचे औचित्य साधून येत्या आठ दिवसांत (३० ऑक्टोबपर्यंत) महाराष्ट्राच्या विविध भागांत वैद्यांची ‘आहाराकडून आरोग्या’कडे विषयावर ४०० व्याख्याने आयोजित केली आहेत. या व्याख्यानांच्या माध्यमातून एकाच वेळी सुमारे ३५ ते ४० हजार रहिवाशांपर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे.

* लहान मुलांमध्ये स्थूलता व इतर व्याधी जडण्याचे प्रमाण वाढत आहे?

उशिरा उठणे आणि व्यायामाचा अभाव ही स्थूलतेची (ओबेसिटी) मुख्य कारणे आहेत. अलीकडे विद्यार्थी शाळा, शिकवण्या या व्यवस्थेत अडकला आहे. खेळणे, व्यायाम होत नाही. त्यात बीजद्रव्या (पोषक मूल्य) सारखा आहार मुलांकडून सेवन केला जात नाही. पौष्टिक आहाराऐवजी बिस्किटे, पाव, पिझ्झा, बर्गरला कुटुंबीय अधिक प्राधान्य देतात. शीतपेयांचा धडाका लावला जातो. ते आता प्रतिष्ठेचे मानले जाते. त्यात दूरचित्रवाहिन्यांवर सतत खाऊपिऊच्या जाहिरातींचा धडाका असतो. त्या जाहिरातींना आपण लवकर वश होतो. या बाहेरच्या खाण्याने शरीरातील नियंत्रण सुटते. मग, लहानपणापासून काही व्याधी पाठपुरावा करण्यास सुरुवात करतात. हे प्रकार रोखण्यासाठी वैद्य मंडळी शाळांच्या माध्यमातून जनजागृतीसाठी व्याख्याने देतात.

* शाळकरी विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी काही उपक्रम हाती घेण्यात आले आहेत का?

शालेय अभ्यासक्रमात आयुर्वेदाचा अंतर्भाव करावा म्हणून गेल्या काही वर्षांपासून आयुर्वेद व्यासपीठ प्रयत्न करीत आहे. शासनाकडे व्यासपीठाने शालेय अभ्यासक्रमात कशी पुस्तके असावीत, ती पुस्तके सादर केली आहेत. सातवी ते नववीपर्यंतच्या अभ्यासक्रमात विज्ञान विषय असतो. त्याचाच एक भाग म्हणून शासनाने आयुर्वेद विषयाचा अभ्यासक्रमात समावेश करावा. आयुर्वेदाचे सिद्धांत पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले तरी विद्यार्थी, पालकांची पाश्चात्त्य आहाराला चिकटलेली मने दूर होण्यास साहाय्य होईल. अवेळी, घाईने खाण्याचे दुष्परिणाम, सहा चवींचे पदार्थ नित्यनेमाने आहारात पाहिजेत. पहिले पचवा, मग खा. दुपार, सूर्यास्तानंतर खाल्लेले भोजन आरोग्यास कसे अपायकारक आहे. प्रसन्नचित्ताने भोजन घेणे असे विषय विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवले तर मुलांना आहार कसा घ्यावा, याचे संस्कार शाळेतून मिळतील.

* वयात येणाऱ्या मुलामुलींसाठी लैंगिक शिक्षणाबाबत काही उपक्रम आहेत का?

पौगंडावस्थेतील मुलामुलींसाठी लैंगिक क्षिक्षणाचा भाग म्हणून ‘कळी उमलताना’ या कार्यक्रमांतर्गत स्वतंत्र व्याख्याने आयोजित केली जातात. मुली, त्यांची आई यांच्यामध्ये सुसंवाद राहावा हा त्यामागील उद्देश असतो. मासिक पाळी सुरू झाल्यानंतर घ्यावयाची काळजी, आरोग्यविषयक मार्गदर्शन या वेळी केले जाते. मुले, त्यांचे पालक यांच्यासाठी अशीच शिबिरे घेतो. इयत्ता सातवी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी या उपक्रमासाठी निश्चित केले जातात. या वयात कोणता आहार घेतला पाहिजे. उमलत्या व बदलत्या वयाच्या उंबरठय़ावर आपली मानसिक स्थिती उत्तम ठेवण्यासाठी करायचे व्यायाम, योग, आहार पद्धती मुलामुलींना सांगितले जातात.

* चाळिशी उलटली की हल्ली प्रत्येकाला धस्स होतंय, कारण काय?

माणूस हल्ली मनाने कमकुवत होत चालला आहे. जिद्द, धडाडी, उमेद हे शब्द हद्दपार होतात की काय, अशी शंका यायला लागली आहे. व्यायाम केला जात नाही. आहारातील तुपाचा प्रभाव कमी झाला आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत तूप खाऊन सुखाने जगा. तुपासाठी कर्ज काढा; पण सुदृढ आरोग्यासाठी तूप खा. हे आहारशास्त्रातील तत्त्व मागे पडले आहे. गाईच्या तुपात अ, क जीवनसत्त्व असते. बुद्धी वाढ होते. कोलेस्ट्रॉल कमी करण्यास ते मदत करते. कॅन्सर प्रतिबंधक म्हणून ते महत्त्वाची भूमिका बजावते. जोपर्यंत परदेशातून असे काही संशोधन शिक्का मारून आपल्याकडे येत नाही तोपर्यंत आपण त्याचा स्वीकार करीत नाहीत, हे दुर्दैव आहे. आपल्याकडे सगळे सज्ज आहे; त्याकडे आपण ढुंकूनही पाहत नाहीत.

* दिवाळी सणातील मिष्टान्न, आहार व इतर प्रयोजनांचे महत्त्व काय असते?

दिवाळीपासून शिशिर ऋतूला सुरुवात होते. हवेतील रूक्षता वाढते. थंडीचे दिवस येतात. ओठ, पाय फुटतात. वात प्रकोप वाढतो. या सगळ्या व्याधींना अटकाव करण्यासाठी आपण दिवाळीत अभ्यंग तेल अंगाला चोपून आंघोळ करतो. या तेलाने प्रतिकारशक्ती वाढते. स्नायू बळकट होतात. रूक्षता, कोरडेपणा कमी होतो. मलावरोध कमी होतो. दीर्घायुष्यासाठी हे नियमित करणे आवश्यक असते. दिवाळीत चिराट (चिबड) हे कडू फळ फोडले जाते. त्याचा थोडा स्वाद जिभेला लावला जातो.  त्वचाविकार रोखण्यासाठी हे प्रयोजन असते. शरीराचा बाह्य़ भाग सुस्थितीत केल्यानंतर शरीराच्या आतील भागातील शुष्कपणा घालविण्यासाठी आपण तेल, तूप, सुकामेवासारखे पौष्टिक पदार्थ खातो. या सणात हे पदार्थ पोटात गेले पाहिजेत.

* आयुर्वेद जनजागृतीसाठी व्यासपीठाचे अन्य काही प्रयत्न?

आयुर्वेद प्रसाराचा एक भाग म्हणून व्यासपीठातर्फे वैद्य, सर्वसामान्यांना उपयोगी पडतील, अशी आयुर्वेद अभ्यासाची पुस्तके प्रकाशित केली जातात. ‘शालेय शिक्षणात आयुर्वेद’ या पुस्तकात दैनंदिन जीवनात प्रत्येकाला घरच्या घरी आरोग्य उपचार कसे करावेत याची माहिती देण्यात आली आहे. ‘औषधे रानावनताली’ या पुस्तकात विविध भागांत मिळणाऱ्या वनौषधींचे लॅटिन, इंग्रजी, स्थानिक भाषेतील माहिती संकलित केली आहे. दरवर्षी ‘आयुर्वेद दैनंदिनी’ प्रसिद्ध करून त्यात राज्यासह परराज्यातील २५०० वैद्यांचे पत्ते, संपर्क, आयुर्वेदविषयक लेख प्रसिद्ध केले जातात. गेल्या सोळा वर्षांतील ही दैनंदिनी म्हणजे एक आयुर्वेदातील संदर्भग्रंथ आहे. दरवर्षी आरोग्य, उपचाराचा एक विषय (थीम) घेऊन दैनंदिनी प्रकाशित केली जाते.

* ग्रामीण, आदिवासी भागांतील वैदूंसाठी काही उपक्रम राबविले जातात का?

कोणतेही वैद्यकीय शिक्षण न घेता जंगल, झुडपातील वनौषधांची चांगली माहिती असलेली वैदू (वैद्य) मंडळी स्थानिक पातळीवर नैसर्गिक पद्धतीने औषधे देण्याचे काम करतात. जुनोटी (ता. पेठ, जि. नाशिक) येथे एक वैद्य लकवा केंद्र चालवितो. वनस्पती, वनौषधींपासून तयार केलेल्या काढय़ांच्या माध्यमातून ते विविध शारीरिक व्याधी बऱ्या करतात. अशा मंडळींची उपचार पद्धती शहरी भागातील वैद्यांना मिळावी म्हणून ग्रामीण भागात वैद्य संमेलने भरवली जातात. त्यामुळे आयुर्वेद उपचार पद्धतीची देवाणघेवाण होते. वनौषधींची लागवड व्हावी यासाठी आयुर्वेद फार्मिगसाठी प्रयत्न केले जात आहेत.