भूमिगत गटार योजनेच्या कामाचा फटका; महापालिकेची इंटरनेट सेवा कोलमडली
मीरा-भाईंदर महापालिकेच्या भूमिगत गटार योजनेच्या खोदकामामुळे भाईंदर पश्चिमेकडील तब्बल सात हजार दूरध्वनी बंद झाले आहेत. या कामाचा खुद्द महापालिकेलाही फटका बसला आहे. या कामामुळे महापालिकेची इंटरनेट सेवा खंडित झाल्याने गेल्या पाच दिवसांपासून नागरी सुविधा केंद्राचे काम ठप्प झाले आहे. याचा थेट परिणाम महापालिकेच्या वसुलीवर तर झाला आहेच, शिवाय नागरिकांनाही त्याचा भरुदड बसत आहे.
भाईंदर पश्चिमेकडील पोलीस स्टेशन ते फाटक या रस्त्यावर भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. एकाच वेळी तीन ठिकाणी काम सुरू असल्याने नागरिकांना त्रास तर होतच आहे शिवाय या कामामुळे खुद्द महापालिकेची ऑनलाइन सेवा ठप्प झाली आहे. साठ फुटी रस्त्याच्या नाक्यावर खोदाईचे काम सुरू असताना जेसीबी यंत्राने महानगर टेलिफोन निगमची केबलच तोडून टाकली. यामुळे परिसरातले सात हजार दूरध्वनी बंद झाले. त्याशिवाय महापालिकेची इंटरनेट सेवाही कोलमडली.
परिणामी भाईंदर पश्चिमेकडील महापालिकेच्या मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्रातील कामकाज पाच दिवसांपासून बंद आहे. या केंद्रात मालमत्ता कर, पाणीपट्टी कर आदींचा भरणा तसेच जन्म-मृत्यू दाखले, विवाह नोंदणी आदी सेवा नागरिकांना दिल्या जातात. परंतु इंटरनेट सेवा खंडित झाल्याने केंद्रातले काम रखडले आहे.

पालिकेच्या वसुलीवर परिणाम
नागरी सुविधा केंद्रातील कामकाज बंद पडल्याचा फटका महापालिकेच्या वसुलीवर झाला आहे. मालमत्ता कराचा भरणा ऑनलाइन होत असल्याने सध्या नागरिकांकडून कराची रक्कम स्वीकारणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे करभरणा करण्यासाठी येत असलेल्या अनेकांना हात हलवत परत जावे लागत आहे. मार्च महिन्यात आर्थिक वर्ष संपत असल्याने सध्या दररोज सात ते आठ लाख रुपये कररूपाने या केंद्रात जमा होतात. मात्र ही वसुलीही बंद पडली आहे.