पाथर्लीतील ‘सतुला’ इमारत परिसरातील रहिवाशांचा विरोध
डोंबिवली पूर्व येथील पाथर्ली भागातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या प्रकल्पात बाधित होत असलेल्या ‘सतुला’ इमारतीच्या गच्चीवर या भागातील एका शिवसैनिकाने बेकायदा भ्रमणध्वनी मनोरा उभारण्याचे काम सुरू केले आहे. महापालिकेला दोन दिवस सुट्टी असल्याने अतिक्रमण विरोधी पथकाला गुंगारा देत ही उभारणी सुरू असल्याचे दिसून येत आहे. हा बेकायदा भ्रमणध्वनी मनोरा उभारण्यास रहिवाशांचा विरोध आहे. या शिवसैनिकाचा पाथर्ली भागात दबदबा असल्याने स्थानिक रहिवासी त्याला वचकून असल्याचे समजते.
जितेश पाटील असे या शिवसैनिकाचे नाव आहे. पाथर्ली झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या शेजारी त्याच्या मालकीची सहा माळ्याची एक जुनी इमारत उभी आहे. सरकारी जमिनीवर असलेल्या सतुला इमारतीचा काही भाग महापालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या इमारतींमध्ये बाधित होत आहे.
दहा दिवसांपूर्वी या इमारतीच्या आसपास राहणाऱ्या रहिवाशांनी महापालिकेच्या डोंबिवलीतील ‘फ’ प्रभाग कार्यालयात या भ्रमणध्वनी मनोऱ्याची तक्रार प्रभाग अधिकारी भरत जाधव यांना दिली. जाधव यांनी तातडीने अधीक्षक संजय कुमावत व त्यांच्या पथकाला भ्रमणध्वनी मनोऱ्याची पाहणी व कारवाई करण्यासाठी पाठविले. पथक घटनास्थळी गेले तेव्हा त्यांना सतुला इमारतीच्या गच्चीवर मनोरा उभारणीचे काम सुरू असल्याचे आढळले. मनोरा उभारणीस महापालिकेच्या नगररचना विभाग व अन्य विभागांच्या परवानग्या घेणे आवश्यक आहे. तशी विचारणा कर्मचाऱ्यांनी सतुला इमारतीचे मालक जितेश पाटील यांना केली. त्या वेळी त्यांच्याकडून नकारात्मक उत्तरे मिळाली. महापालिकेच्या पथकाने तातडीने हे काम थांबविण्याचे आदेश पाटील यांना दिले. यापुढे हे काम करण्यात येणार नाही, असे आश्वासन पाटील यांनी महापालिका पथकाला दिले. इमारतीवरील एका मनोऱ्यापासून इमारत मालकाला दरमहा २० ते २५ हजार रुपयांचे भाडे मिळणार आहे.
दोन दिवस डॉ. आंबेडकर जयंती व रामनवमीनिमित्त महापालिकेला सुट्टी असल्याने कर्मचारी कारवाईला येणार नाहीत हा विचार करीत सतुला इमारतीच्या गच्चीवर बेकायदा भ्रमणध्वनी मनोरा उभारणीचे काम जोरात सुरू असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. दरम्यान, महापालिकेला सुट्टी असल्याने कर्मचाऱ्यांशिवाय कारवाई करणे शक्य नाही. याबाबतची कारवाई शनिवारी करण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्याने रहिवाशांना दिले आहे. जितेश पाटील यांच्यावर बेकायदा भ्रमणध्वनी मनोरा उभारला म्हणून ‘एमआरटीपी’ कायद्यान्वये नोटीस बजावण्याची कार्यवाही ‘फ’ प्रभाग कार्यालयाने दोन दिवसांपूर्वीच केली आहे. परंतु, मध्ये दोन दिवस सुट्टय़ा आल्याने नोटीस देता आली नाही, असे एका कर्मचाऱ्याने सांगितले.

आपला कार्यकर्ता, जरा सबुरीने घ्या.!
पथक माघारी फिरल्यानंतर शिवसेनेच्या महापालिका सभागृहातील एका पदाधिकाऱ्याने ‘फ’ प्रभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क करून मनोऱ्याची उभारणी सुरू राहू द्या, यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जाते. आपला कार्यकर्ता असल्याने कारवाई करताना सबुरीने घ्या, अशी सूचना प्रभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांना केली जात असल्याचे सांगितले जाते. पाथर्ली भागातील शिवसेनेचा एक बडा पदाधिकारी सुरुवातीला या बेकायदा भ्रमणध्वनी मनोऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे, यासाठी आग्रही होता. पण नंतर त्याचा विरोध आश्चर्यकारकरीत्या मावळला असे समजते.

इमारत ४० वर्षे जुनी
सतुला इमारत चाळीस वर्षे जुनी आहे. या इमारतीची अवजड भ्रमणध्वनी मनोरा सांभाळण्याची क्षमता नाही. दाटीवाटीने हा मनोरा इमारतीच्या गच्चीवर बसविण्यात येत आहे. पैशाच्या मोहापायी हे काम सुरू असले तरी, एवढा अवजड मनोरा सतुला इमारत सांभाळू शकत नाही. मनोऱ्यापासून निघणाऱ्या लहरींमुळे विविध आजार निर्माण होण्याची शक्यता असल्याने रहिवासी या मनोऱ्याला कडाडून विरोध करीत आहेत.

सतुला इमारतीचे मालक जितेश पाटील यांनी इमारतीच्या गच्चीवर बेकायदा भ्रमणध्वनी मनोऱ्याचे उभारणीचे काम सुरू केले आहे. अशा रहिवाशांच्या तक्रारी आल्यानंतर दोन वेळा तेथील सामान उचलून आणले. तरीही त्यांनी गुरुवार, शुक्रवार या पालिकेच्या सुट्टीच्या दिवशी मनोरा उभारणीचे काम केले असल्याच्या तक्रारी येत आहेत. सुट्टी असूनही ते काम पाहण्यासाठी कर्मचाऱ्याला पाठविण्यात आले आहे. सोमवापर्यंत इमारत मालकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येईल.
– भरत जाधव, ‘फ’ प्रभाग क्षेत्र अधिकारी