गाणे ही मला आनंद देणारी गोष्ट असून मी त्याकडे कधी व्यवसाय म्हणून पाहिले नाही, असे वक्तव्य शास्त्रीय संगीत गायिका आरती अंकलीकर यांनी रविवारी वेध व्यवसाय परिषदेत केले.
लहानपणीच घरात आईच्या गाण्याचा संस्कार माझ्यावर झाला होता. वेळोवेळी मिळालेल्या चांगल्या माणसांमध्ये शाळेतील संगीत शिक्षकही चांगले मिळाले. त्यांनी मला शिकवण्याचाच विडा उचलला होता. या वेळी त्यांनीच मला रियाजाचे महत्त्व पटवून दिले. माझे आई-वडील कडक शिस्तीचे होते. वडील रियाज करताना मण्यांचा भरलेला डबा घेऊन बसत व प्रत्येक हरकतीनंतर त्यातील मणी वेगळा करत, याचा माझ्यावर परिणाम झाला. वडिलांनीच माझा गळा तयार करून घेतला. गायिका साधना सरगम पाच वर्षांची असल्यापासून गायची . त्यामुळे लहानपणी प्रथम मी तिच्याकडूनच गाण्याची प्रेरणा घेतल्याचे त्या म्हणाल्या.