चतुरंगचे रंगसंमेलन ही डोंबिवलीकरांसाठी एक आनंदाची पर्वणी असते. सांस्कृतिक नगरीत सांस्कृतिक कार्यक्रमाने सरत्या वर्षांला निरोप देता येत असल्याने डोंबिवलीकर या संमेलनाची दरवर्षी आतुरतेने वाट पाहात असतात. यंदाही रंगसंमेलनाचा हा कार्यक्रम स्मरणीय असा ठरला. ‘बियॉण्ड बॉलीवूड’ आणि भीमसेनी स्वरोत्सव या संगीतोत्सवाने डोंबिवलीकरांची संध्याकाळ रमणीय झाली.

चतुरंग प्रतिष्ठानचे रौप्यमहोत्सवी रंगसंमेलन शनिवारी डोंबिवलीतील स.वा. जोशी विद्यालयाच्या पटांगणात पार पडले. रंगसंमेलनाची सुरुवात बियॉण्ड बॉलीवूड हा हिंदी चित्रगीतांवरचा स्वर सूर नृत्योत्सवाने झाली. पद्मश्री पंडित विजय घाटे यांचे लयबद्ध तबलावादन आणि त्यांना अमर ओक यांच्या बासरीच्या सुरांची साथ यामुळे वातावरण प्रफुल्लित झाले होते. नागेश आडगावकर यांनी त्यांना गायनाची साथ देत ‘तुज संग बैर लगाया ऐसा’, ‘धन्य भाग सेवा का अवसर पाया’ यासह विविध हिंदी चित्रपटांतील गाणी गायली. अनय गाडगीळ (की बोर्ड), अभिजीत भदे (ड्रम), रितेश ओहोळ (गिटार), नीलेश परब (पर्कशन्स- कोंगाज, जेरबे व दंगुका) यांनीही आपल्या अदाकारीने कार्यक्रमात रंगत आणली. या तालवाद्यांच्या तालावर कथ्थक नृत्यांगना शीतल कोलवालकर यांची पावलेही अगदी लीलया थिरकली.

कार्यक्रमाचा शेवट भीमसेनी स्वरोत्सवाने झाला. पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य जयतीर्थ मेवुंडी व आनंद भाटे यांनी स्वरभास्कर जोशी यांच्या विविध रचनांना उजाळा दिला. विश्वनाथ शिरोडकर (तबला), सीमा शिरोडकर (हार्मोनियम) यांनी त्यांना साथसंगत केली. आनंद भाटे यांनी ‘पंचतुंड नर रुंडमाळधर’ ही नांदी गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. ‘संगीत तुलसीदार’ या नाटकातील पहाडी रागावर आधारित ‘मन हे रामरंगी रंगले’ हे पद गायले. जयतीर्थ मेवुंडी यांनी ‘राजस सुकुमार मदनाचा पुतळा’, ‘सो सुख खानी तू विमला’ या ओव्या सादर केल्या. ‘जो भजे हरी को सदा’ या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली. अशा या चतुरंगच्या संगीतोत्सवात एक संध्याकाळ न्हाऊन निघाली होती.