विद्या प्रसारक मंडळाच्या विद्यार्थ्यांचा प्रकल्प

ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स पदविका अभ्यासक्रमाच्या अखेरच्या वर्षांला शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली एक स्मार्ट कचरा व्यवस्थापन डबा तयार केला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील काही तत्त्वांचा वापर करून बनविलेल्या या डब्याचे तीन भाग असून त्यात अनुक्रमे ओला, सुका आणि वैद्यकीय कचरा वेगवेगळा ठेवता येणार आहे. सध्या ब्राझिल येथे आयोजित युवा गटांच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात विद्या प्रसारकच्या विद्यार्थ्यांनी बनविलेला हा कचरा व्यवस्थापन प्रकल्प मांडण्यात आला आहे. सौरभ कदम, मिहीर आमरे या विद्यार्थ्यांनी स्मार्ट कचरा व्यवस्थापन प्रकल्प तयार केला आहे. त्यांना संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर, डॉ. सुधाकर आगरकर यांचे सहकार्य लाभले.मार्गदर्शिका म्हणून डॉ. कीर्ती आगाशे यांनी काम पाहिले.

कचरा असा नष्ट होणार..

  • कचरापेटीच्या झाकणांना इलेक्टॉनिक ‘सेन्सर’ची सुविधा
  • कचरा टाकणारी व्यक्ती जवळ येताच, त्याचे झाकण आपोआप उघडते.
  • ओल्या कचऱ्याचे विघटन होण्यास ४० दिवसांचा कालावधी लागतो.
  • स्मार्ट डब्यात ओल्या कचऱ्याचे लहान तुकडे करण्याची सोय
  • कचऱ्याचे २५ दिवसांत सेंद्रिय खतात रूपांतर
  • ओल्या कचऱ्यातील पाणी बाहेर जाण्यासाठी डब्याच्या या भागातील तळाला छिद्र
  • कचऱ्याचा डबा ७० टक्के भरल्यानंतर मोबाइलवर संदेश
  • ओल्या आणि सुक्या कचऱ्याची चुकून अदलाबदल झाल्यास विशिष्ट ध्वनीद्वारे त्याची सूचना