आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यावर आपल्यापुरते जगणे सोडून काही प्रमाणात का होईना सामाजिक कामात योगदान देणे म्हणजे वानप्रस्थाश्रम या विचाराने प्रेरित झालेली अनेक माणसे अवतीभोवती दिसतात. अतिशय निरपेक्ष भावनेने त्यांचे हे कार्य सुरू असते. अंबरनाथ येथील अमृत अळसुंदेकर त्यापैकी एक आहेत..

नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर आता आराम करायचा किंवा नोकरीतील व्यापामुळे जी काही हौस-मौज करता आली नाही ती करायची, असे बरेच जण मनाशी ठरवितात. मात्र यालाही काही अपवाद असतात. नोकरीमुळे सामाजिक कामासाठी आपण वेळ देऊ शकलो नाही तो आता देता येईल, अशा विचारातून काही मंडळी कामाला सुरुवात करतात. काही जण हे काम वैयक्तिक स्तरावर तर काही जण संस्था/संघटनेच्या माध्यमातून करतात. अंबरनाथ येथील अमृत गोपाळ अळसुंदेकर यांनीही सेवानिवृत्तीनंतर नागरिक सेवेचा वसा घेतला आणि आज वयाच्या ७९व्या वर्षांतही अळसुंदेकर यांचे ‘नागरिक सेवा मंडळ’या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून काम सुरू आहे. मंडळाचे खजिनदार म्हणूनही त्यांच्याकडे जबाबदारी आहे.

अमृत अळसुंदेकर यांचे शिक्षण नाशिक जिल्ह्य़ातील नांदगाव येथे झाले. १९५६ मध्ये दहावी झाल्यानंतर त्यांनी काही काळ सैन्यदलात ‘सिग्नल कोअर’ विभागात नोकरी केली. पुढे ‘मर्फी रेडिओ’ कंपनीत ‘टेक्निशियन’ म्हणून ते रुजू झाले. ३० वर्षांच्या दीर्घ सेवेनंतर १९९२ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. निवृत्तीनंतरचा काळ सामाजिक कामात व्यतीत करावा, असे त्यांच्या मनात होतेच. अंबरनाथमध्ये १९८०मध्ये सनतकुमार छाया यांनी स्थापन केलेल्या नागरिक सेवा मंडळाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कामाला सुरुवात केली. मंडळाच्या विविध उपक्रमात आजही त्यांचा सक्रिय सहभाग असतो.

अंबरनाथ पश्चिमेला असणाऱ्या स्मशानभूमीची अवस्था चांगली नव्हती. अंत्यविधीचे सर्व सामान लोकांना वेगवेगळ्या ठिकाणाहून गोळा करावे लागत होते. त्यामुळे लोकांची खूपच गैरसोय होत होती. नागरिक सेवा मंडळाच्या माध्यमातून अंत्यविधीचे सर्व सामान स्मशानभूमीतच माफक दरात मिळण्याची व्यवस्था करण्यात आली.  पुरेसे रॉकेल उपलब्ध व्हावे यासाठी मंडळाच्या नावाने शिधापत्रिकाही काढण्यात आली. मंडळातर्फे या स्मशानभूमीत करण्यात आलेले आणखी एक महत्त्वाचे काम म्हणजे मृतदेहाच्या दहनासाठी येथे ‘गॅस फायर’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. १५० ते २०० मृतदेहांचे दहन या ‘गॅस फायर’वर करण्यात आले. पुढे मंडळाने ही व्यवस्था नगरपालिकेकडे हस्तांतरित केली. पण पुरेशा देखभालीअभावी ही चांगली सुविधा बंद पडल्याची खंत अळसुंदेकर व्यक्त करतात.

मंडळातर्फे अन्नदान हा उपक्रम चालविला जातो. याविषयी माहिती देताना अळसुंदेकर म्हणाले, अंबरनाथ, बदलापूर परिसरातील अंध, अपंग वसतिगृहे तसेच आर्थिकदृष्टय़ा दुर्बल गटातील विद्यार्थ्यांसाठी मंडळाने हा उपक्रम सुरू केला आहे. या परिसरातील आठ ते दहा संस्थांना किमान ३०० ते कमाल ५०० रुपयांपर्यंतचे किराणा माल सामान विकत घेण्यासाठी रक्कम दिली जाते. ती ती संस्था आवश्यक तो किराणा माल विकत घेऊन संस्थेतील गरजू व गरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविते. सध्याच्या काळात ही रक्कम तुटपुंजी असली तरी या विद्यार्थ्यांसाठी आमच्याकडून खारीचा वाटा इतपत का होईना मदत  केली जाते, याचे समाधान आहे.

कर्करोग आणि अन्य गंभीर आजार असलेल्या आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील लोकांसाठी वर्षांतून एकदा ५०० ते अडीच हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. डायलिसिस, केमोथेरपीच्या अनेक गरजू रुग्णांना या सेवेचा फायदा झाला आहे. काही मोठय़ा शस्त्रक्रियांसाठीही रुग्णांना मदत केली जाते.

या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. या भावनेतून तरुण पिढीला सामाजिक कार्याकडे वळविण्याच्या उद्देशानेही अळसुंदेकर प्रयत्नशील असतात. याचाच एक भाग म्हणून नागरिक सेवा मंडळाच्या अध्यक्ष व सचिवपदी अनुक्रमे सत्यजीत बर्मन व प्रकाश नायर या तरुणांची निवड करण्यात आली आहे. या दोघांनी आपल्या काही तरुण सहकाऱ्यांसह अंबरनाथ सिटिझन फोरम सुरू केला आहे. अळसुंदेकर यांनी या फोरमला नागरिक सेवा मंडळाशी संलग्न करून घेतले आहे. या फोरमच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम सुरू असतात. यात आरोग्य तपासणी शिबीर, रक्तदान शिबीर, वृक्षलागवड व जतन असे उपक्रम सुरू असतात. अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर प्रसिद्ध आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला येथे मोठय़ा संख्येत भाविक येत असतात. महाशिवरात्रीच्या आदल्या दिवसापासून ते दुसऱ्या दिवशीपर्यंत येथे येणाऱ्या भाविकांसाठी खाद्यपदार्थ, चहा, पाणी उपलब्ध करून देण्याचे कामही गेली काही वर्षे सुरू आहे. या मंदिराची देखभाल, दुरुस्ती यासाठी मंडळाने जमा केलेला २२ लाख रुपयाचा निधी पुरातत्त्व विभागाकडे सुपूर्द करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली.

या सगळ्या कामात अळसुंदेकर यांना त्यांची पत्नी सरला, विवाहित कन्या शिल्पा फुलोरे, जावई भरत फुलोरे यांचे सहकार्य मिळते, असे ते आवर्जून सांगतात. निवृत्त झाल्यानंतर आपण आपल्या कुटुंबाबरोबरच असतो. पण आपल्यापैकी प्रत्येकाने जमेल तेवढा वेळ सामाजिक काम करणाऱ्या एखाद्या संस्थेसाठी नक्की द्यावा. वैयक्तिक स्तरावर असे एखादे काम करता आले तर तेही करावे. यातून समाधान आणि आनंद  मिळतो. आपणही कार्यरत राहिल्याने आपला रिकामा वेळ सत्कारणी लागतो, असेही अळसुंदेकर यांनी आवर्जून सांगितले.