कल्याण-डोंबिवली शहरावर अस्वच्छतेचा बसलेला बट्टा पुसून काढण्यासाठी शिवसेनेच्या वतीने परिवर्तनाचा कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या नगरसेवकांना घरचा आहेर देत शहरात रस्त्यांच्या कडेला पडलेले मातीचे ढिगारे हटवा, असे आदेश दिले. तसेच पदपथांच्या लाद्या ठीक करा आणि सर्वसामान्यांना दिलासा द्या, अशा सूचनाही केल्या. पक्षप्रमुखांच्या दौऱ्याला आठवडा उलटून गेला तरीही शहरातील कानाकोपऱ्यात मातीचे बांधकाम साहित्याचे ढीग जैसे थे असून सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्या आदेशालाही वाकुल्या दाखविल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.
पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्त्यांच्या सीमेंट कॉँक्रीटीकरणाची कामे पूर्ण करण्याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. परंतु ज्या ठिकाणचे काम पूर्ण झाले आहे त्या ठिकाणी अनावश्यक पडलेले मातीचे ढिगारे, पेव्हर ब्लॉक लाद्यांचा ढीग, फुटपाथच्या उखडलेल्या लाद्या जशाच्या तशा आहेत. किमान स्टेशन परिसरातील स्थिती तरी सुधारा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. डोंबिवलीतील इंदिरा चौकात अशा प्रकारे मातीचे ढिगारे तसेच पेव्हर ब्लॉकच्या लाद्यांचा ढीग रचण्यात आला आहे. छेडा रोड येथील फुटपाथच्या लाद्या उखडल्या आहेत. गटारावरील झाकणेही गायब झाली आहेत. पीपी चेंबरजवळील फुटपाथच्या लाद्या उखडल्या असून येथील गटाराची झाकणेही तुटली आहेत.

एक दिवसाचा दिखावा करून आम्हाला शहर स्वच्छतेची कळकळ असल्याचा ढोंगीपणा सध्या सुरू आहे. आचारसंहितेच्या काळातही कार्यक्रम करून ताकद दाखविण्याचा प्रयत्न होता. केवळ आदेश देण्यापेक्षा काम केले आहे की नाही हे पाहणी करून योग्य तो निर्णय घ्यावा. सत्ताधाऱ्यांनाही मतांचा जोगवा पुढील पाच वर्षांनी का होईना, पुन्हा मागायचा आहे हे लक्षात ठेवावे.
-निखिल साटम, डोंबिवली