उत्सवांच्या नावाखाली ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांवर कारवाईसाठी ठाणे पोलिसांनी ठाणे आयुक्तातील ३३ पोलीस ठाण्यात स्वतंत्र अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत. त्यांच्याकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारीचा तपास सहायक पोलीस आयुक्त दर्जाचा अधिकारी करणार असून, त्यासाठी १० सहायक पोलीस आयुक्तांकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
उत्सवादरम्यान ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न गंभीर असतो. या मुद्दय़ावर जलद कारवाई व्हावी अशी मागणी असणाऱ्या डॉ. महेश बेडेकर यांनी या प्रश्नी महाराष्ट्र शासनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना १३ मार्च २०१५ रोजी विविध आदेश न्यायालयाने दिले होते. ध्वनिप्रदूषणाच्या तक्रारींबाबत स्वतंत्र यंत्रणा व या तक्रारी स्वीकारण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करावी. असे न्यायालयाने आदेशात म्हटले होते. आदेशाच्या अंमलबजावणी करण्याचा निर्णय ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी घेतला असून त्यानुसार ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, बदलापूर आणि अंबरनाथ या शहरांमध्ये त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
या अधिकाऱ्यांना या तक्रारींची नोंद करण्यासाठी स्वतंत्र रजिस्टर ठेवण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. ध्वनिप्रदूषणाच्या तक्रारी स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक, ई-मेल आयडी, टोल-फ्री क्रमांक आदी माहिती प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती ठाण्याचे सह-पोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी दिली. त्यामुळे आता मंडळांना नियमांत राहूनच उत्सव साजरे करावे लागणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.